गेल्या ४० दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या छगन भुजबळ यांना बुधवारी बॉम्बे रुग्णालयातून जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालयातून भुजबळ यांची रवानगी आर्थररोड तुरुंगात केल्याचे वृत्त सुरुवातीला येत होते. मात्र बॉम्ब रुग्णालयातून भुजबळ जे जे रुग्णालयात नेल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. बॉम्बे हॉस्पिटलमधील भुजबळ यांचा मुक्काम कमालीचा वादग्रस्त ठरला होता.

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तुरुंगात असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे गेल्या ४० दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात होते. भुजबळ यांच्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलमधील दोन खोल्या आरक्षित होत्या असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. भुजबळ यांना रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या रुग्णालय मुक्कामावरुन वाद निर्माण झाला होता. शेवटी बुधवारी संध्याकाळी भुजबळ यांना बॉम्बे रुग्णालयातून पुन्हा जे जे रुग्णालयात नेण्यात आले.

भुजबळ यांना सुरुवातीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या काळात ते जे जे रुग्णालयात होते. त्या वेळी रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाने भुजबळ यांच्यावर होल्टर मॉनिटरिंग, इलेक्ट्रो फिझिओलॉजिकल स्टडी आणि थॅलिअम स्कॅन या तीन चाचण्या करण्यास सुचविले होते. या चाचण्या केईएम इस्पितळात उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले होते. ‘केईएम’मधील पथक तुरुंगात येऊन चाचणी करण्यात तयार होते, परंतु भुजबळ यांनी तुरुंगात चाचणी करून घेण्यास नकार दिला. याशिवाय थॅलिअम स्कॅन चाचणी उपलब्ध नसल्याचेही केईएम इस्पितळाने कळविले. त्यामुळे २६ ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने थॅलिअम स्कॅन खासगी, तर उर्वरित चाचण्या जे. जे. इस्पितळात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दोन चाचण्या झाल्यानंतर भुजबळ यांना २ नोव्हेंबर रोजी जे. जे. इस्पितळातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

विशेष म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी तुरुंग अधीक्षकांनी जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवून भुजबळांविषयी विचारणा केली. त्यावर जे जे रुग्णालयाने ८ नोव्हेंबररोजी उत्तर दिले होते. म्हणजेच भुजबळांविषयी तुरुंग अधीक्षकांना काहीच माहित नव्हते हे स्पष्ट होत असल्याचे दमानिया यांनी याचिकेत म्हटले होते.