१४० लोकल, उद्घोषणांमध्येही बदल होणार; मध्य रेल्वेसमोर आव्हान

रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस नावांमध्ये ‘महाराज’हा शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मध्य रेल्वेला आता बरेच बदल करावे लागणार आहेत. कारण या निर्णयानंतर मध्य रेल्वेला ‘महाराज’या नावासाठी सर्व यंत्रणेतच बदल करावा लागणार असून लोकल, मेल-एक्सप्रेवरील नावांसह, तिकीट व इंडीकेटर्सवरील नावांतही बदल करावे लागणार असून रेल्वे बोर्डाकडून सूचना प्राप्त होताच साधारपण महिन्याभरात ‘महाराज’हे नाव दिसून येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेवरील पूर्वीच्या व्हिक्टोरीया टर्मिनस स्थानकाचे काही वर्षांपूर्वी नामकरण करण्यात येऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस हे नाव ठेवण्यात आले. मात्र या नावात महाराज असा शब्द नसल्याने तो समाविष्ट करावा, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.

या निर्णयानंतर मध्य रेल्वेच्या सर्व यंत्रणेतच बदल करावा लागेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४० लोकल आहेत. यात १० लोकल ठाणे-वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर धावतात. दहा लोकल सोडता अन्य लोकलच्या समोरच्या दिशेने असणाऱ्या सीएसटी या नावात बदल करावे लागतील.

या बदलाबरोबरच सर्वात मोठे बदल सीएसटीहून सुटणाऱ्या ५० मेल-एक्सप्रेस व पॅसेंजर ट्रेनमध्ये करावे लागणार आहेत. मेल-एक्सप्रेसच्या समोर, डब्यांवर छत्रपती शिवाजी टर्मिनस हे नाव नमूद असते.

यात महाराज हा शब्द नमूद

करावा लागेल. तसेच लोकलच्या डब्यात असणारे इंडीकेटर्स, लोकलमध्ये आणि स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या उद्घोषणांमध्येही बदल करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

महिनाभरात बदल शक्य

हे बदल करण्यात रेल्वेला पुढील एक महिना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून बदलाच्या निर्णयाचे लेखी पत्र रेल्वे बोर्डाला पाठविले जाईल आणि त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून महाराज हे नाव नमूद करण्याच्या सूचना केल्या जातील. महाराज हे नाव नमूद करण्यासाठी ‘सीएसटी’नावाने असलेल्या एका कोडमध्येच बदल करावा लागेल. त्यामुळे ‘सीएसएमटी’हे नाव योग्य असेल कि अन्य काही त्याची सर्व पडताळणी रेल्वेकडून केली जाईल.

महाराज हे नाव लोकलच्या दर्शनी भागावर तसेच मेल-एक्सप्रेस डब्यांवर, स्थानकांतील इंटीकेटर्सवर नमूद करावे लागेल. त्याचप्रमाणे तिकीटांवरही हे नाव येईल. परंतु ते कशाप्रकारे नमूद करायचे याबाबत रेल्वे बोर्डाकडून सूचना केल्या जातील. त्याआधी राज्य सरकार रेल्वे बोर्डाला घेतलेल्या निर्णयाची माहिती देईल.  – नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी