आघाडी सरकारच्या काळात मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा आता राज्यातील जिल्हा परिषदा आणि महापालिकांमधील अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. त्यानुसार धुळे, बुलढाणा,औरंगाबादसह राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तसेच कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका आयुक्तांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ सनदी अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांची शिक्षण सचिवपदी झालेली नियुक्ती रद्द करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनातच्या निवासी आयुक्त म्हणून आभा शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शर्मा यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. उदय चौधरी यांची धुळे जिल्हा परिषदेत, राहुल रेखावर यांची बुलढाणा, अभिजित चौधरी यांची औरंगाबाद, एम. देवेंद्रसिंग यांची अकोला तर आस्तिक कुमार पांडे यांची जळगाव आणि एम.जी आरगड यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी पी. शिवशंकर यांची तर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदी सुशील खोडवेकर यांची बदली करण्यात आली आहे.

कडोंमपा आयुक्तपदी सुशील खोडवेकर  
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील सुशील खोडवेकर यांची नियुक्ती झाली आहे. खोडवेकर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. कल्याण-डोंबिवली पालिका क वर्ग झाल्यामुळे या ठिकाणी ‘आयएएस’ आयुक्त देण्याची मागणी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी शासनाकडे केली होती. खोडवेकर बुधवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जाते. विद्यमान आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळात पालिकेत प्रचंड अनागोंदी माजली होती. याविषयी शासनस्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी सोनवणे यांच्या हकालपट्टीची मागणी शासनाकडे केली होती.