मराठी व्यावसायिक रंगभूमीचा पाया असलेली बालनाटय़/बाल रंगभूमी चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी आता स्वतंत्रपणे पहिल्यांदाच अखिल भारतीय बाल नाटय़ संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद आणि नाटय़ परिषदेची सोलापूर उपनगरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल नाटय़ संमेलनाची तिसरी घंटा लवकरच होणार आहे. 

मराठीत प्रायोगिक, व्यावसायिक, कामगार रंगभूमीबरोबरच बालनाटय़ रंगभूमीचे योगदान मोठे आहे. बाल नाटय़ चळवळीची मोठी परंपरा असून आज व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका यात दिसणाऱ्या आघाडीच्या दिग्गज कलाकारांची सुरूवात बाल रंगभूमीवरुनच झाली होती. दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात बाल रंगभूमी किंवा बाल नाटय़विषयक एखादा परिसंवाद, चर्चा अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. बाल रंगभूमीची परंपरा आणि महत्त्व लक्षात घेऊन नाटय़ संमेलनात किरकोळ स्वरूपात या विषयाला स्थान न देता तीन दिवसांचे स्वतंत्र बाल नाटय़ संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
नाटय़ परिषदेच्या सोलापूर उपनगरी शाखेसह सोलापुरातील मुख्य शाखा तसेच सोलापूर जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या अन्य शाखा आणि सोलापुरातील स्थानिक रंगकर्मी यांच्या सहकार्याने हे तीन दिवसांचे पहिले बाल नाटय़ संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.
या संदर्भातील पत्र अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सोलापुरातील उपनगरी शाखेच्या शिष्टमंडळाला सुपूर्द केले. नियामक मंडळाचे सदस्य दिलीप कोरके, प्रा. अजय दासरी, प्रा. इसाक शेख, अमोल ढाबळे, जयप्रकाश कुलकर्णी, मंदार काळे आदी या वेळी उपस्थित होते. विजय साळुंके हे उपनगरी शाखेचे अध्यक्ष आहेत.

येत्या २० ते ३० डिसेंबर या कालावधीत सोलापुरात पहिले अखिल भारतीय बाल नाटय़ संमेलन घेण्याचे ठरविले आहे. याबाबत संबंधितांशी नुकतीच प्राथमिक बोलणी व चर्चा झाली. बालनाटय़ चळवळ आणि बालनाटय़ रंगभूमीला प्रोत्साहन मिळावे आणि बालनाटय़ चळवळ वाढीस लागावी, हा मुख्य उद्देश यामागे आहे. तीन दिवसांच्या या संमेलनाच्या निमित्ताने बालनाटय़विषयक र्सवकष कार्यक्रम, चर्चा, बालनाटय़ शिबिर, बालनाटय़ प्रयोग, बालरंगभूमीविषयक विविध प्रश्न, बालनाटय़ चळवळ या सर्वाचा ऊहापोह केला जाणार आहे.
मोहन जोशी ,अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद