पश्चिम उपनगरांतील नद्या आणि नाल्यांच्या सफाईची पाहणी करण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पत्रकारांसमवेत बुधवारी दौऱ्याचे आयोजन केल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये धावपळ उडाली. भाजपने उपमहापौर अलका केरकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारीच पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याची घोषणा केली. पालिका सभागृह आणि वैधानिक समित्यांमध्ये एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये आता नालेसफाईच्या दौऱ्यावरून शीतयुद्ध सुरू झाले आहे.
दरवर्षी महापौरांचा नालेसफाई पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. या दौऱ्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना आमंत्रित केले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच शहरातील नाले आणि मिठी नदीतील गाळ सफाईच्या कामाची पाहणी केली होती. त्या वेळी स्नेहल आंबेकर मुंबईत नसल्याने दौऱ्यात सहभागी होऊ शकल्या नव्हत्या. मात्र उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांचे निधन झाल्यामुळे हा दौरा मिठीकाठी रद्द करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर स्नेहल आंबेकर यांनी पश्चिम उपनगरातील नद्या आणि नाल्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहिसर नदी, पोयसर नदी, पिरामल नाला, ओशिवारा नाला, मोगरा नाला, ईर्ला नाला आदी ठिकाणी सुरू असलेल्या सफाईच्या कामांची बुधवारच्या दौऱ्यात महापौर पाहणी करणार आहेत. सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापौर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून नालेसफाईची पाहणी करणार असल्याचे मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. तात्काळ रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास भाजपनेही बुधवारीच पूर्व उपनगरांमध्ये नालेसफाईच्या कामांच्या पाहणीच्या दौऱ्याचे आयोजन केले. पूर्व उपनगरांतील नाल्यांबरोबरच वांद्रे येथील मिठी नदीवरील एमटीएनएल पूल येथेही उपमहापौर भेट देणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार, उपमहापौर अलका केरकर, भाजपचे आमदार, नगरसेवक सहभागी होणार आहेत. बुधवारी दुपारी २ वाजता या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी भाजपनेही नालेसफाईच्या पाहणीसाठी दौरा आयोजित केल्यामुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता आहे.