‘कॉमन मॅन’ची तरुणांना साद

सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांची उदासीनता यामुळे राजकारण-सार्वजनिक जीवनाबाबत तरुणांमध्ये निर्माण होत असलेली घृणा

प्रतिनिधी मुंबई | December 27, 2012 4:28 AM

सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांची उदासीनता यामुळे राजकारण-सार्वजनिक जीवनाबाबत तरुणांमध्ये निर्माण होत असलेली घृणा बाजूला सारून तरुणांना राजकारणात येण्याची साद प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ने घातली आहे. हात थरथरत असले तरी मनात तरुणाईबद्दल असलेल्या विश्वासाच्या ताकदीतून लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’चे अर्कचित्र पुण्यात भरणाऱ्या तिसऱ्या भारतीय छात्र संसदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेखाटले आहे.
‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ व ‘भारतीय छात्र संसद फाऊंडेशन’तर्फे तिसरी भारतीय छात्र संसद १० ते १२ जानेवारी २०१३ या कालावधीत पुण्यात होत आहे. यासाठी तरुणाईला साद घालणारे ‘तरुण भारतासाठीचा जाहीरनामा’ या व्यंगचित्रासाठी लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून ‘कॉमन मॅन’ पुन्हा अवतरला आहे. या चित्राचे अनावरण खुद्द लक्ष्मण व त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘इंडियन र्मचट चेंबर’च्या सभागृहात झाले. राज्याचे युवक कल्याण व क्रीडामंत्री पद्माकर वळवी, छात्र संसदेचे निमंत्रक प्रा. राहुल कराड यावेळी उपस्थित होते.
लक्ष्मण यांना वयोपरत्वे आता बोलता येत नसल्याने त्यांच्या पत्नी कमला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छात्र संसदेसाठी ‘कॉमन मॅन’तर्फे तरुणाईला राजकारणाबाबत सकारात्मक संदेश देण्यासाठी चित्रे काढण्याची विनंती कराड यांनी केली. त्या चित्राची संकल्पना लक्ष्मण यांना सांगण्यातच १५ दिवस गेले. नंतर त्यांनी काही चित्रे रेखाटली व मग आम्ही एक निश्चित केले, असे कमला यांनी सांगितले. ‘तरुण भारतासाठीचा जाहीरनामा’ कॉमन मॅन अत्यंत आशाने वाचत आहे, असे या चित्रात दर्शवण्यात आले आहे.
सध्या देशात सुरू असलेली आंदोलने, टीकाटिप्पणी ही राजकीय जागरूकतेची लक्षणे आहेत. लोकप्रतिनिधी, होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, युवकांनी राजकारणाबद्दल दूषित दृष्टिकोन न ठेवता त्यात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन वळवी यांनी केले.
यंदाच्या छात्र संसदेला देशातील २८ राज्यांतील ४०० विद्यापीठांतील सुमारे १२ हजार विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. नऊ विद्यापीठांचे कुलगुरू, आठ विधानसभांचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही तीन जानेवारी रोजी अमेरिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहे, अशी माहिती राहुल कराड यांनी दिली.    

First Published on December 27, 2012 4:28 am

Web Title: common man calling to youth