गेले काही दिवस वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ताप, हिवतापाच्या साथीचा प्रादुर्भाव होत असतानाच डेंग्यूनेही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने पालिकेच्या विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालये, नर्सिगहोम, दवाखाने, खासगी रक्त तपासणी केंद्रे आदींशी समन्वय साधून रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
ऑगस्टमध्ये पालिका रुग्णालयात ४४, तर सप्टेंबरमध्ये १२३ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले होते. आता डेंग्यूची बाधा झाल्याचा संशय असलेले आणखी काही रुग्ण सरकारी आणि पालिका रुग्णालयात उपचारासाठी आले आहेत. मात्र साथीच्या आचारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे डासांचा प्रादुर्भाव वाढलेल्या परिसरात पालिकेमार्फत धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या परिसरातील विभाग कार्यालयांतील संबंधित अधिकाऱ्यांना खासगी दवाखान्यांशी समन्वय साधण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत देण्यात आले आहेत.