• सीएसटी इमारतीच्या अंतर्गत भागाला झळाळी
  • एलईडी दिव्यांच्या माध्यमातून इमारतीच्या सौंदर्यावर प्रकाश

प्रवाशांना उत्तम सेवा देण्याच्या प्रयत्नाबरोबरच मध्य रेल्वेने आता आपल्या गतवैभवाला झळाळी देण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐतिहासिक आणि जागतिक वारसा मानल्या जाणाऱ्या इमारतीच्या बाह्य़ भागावर प्रकाशझोत टाकून ही इमारत उजळणाऱ्या मध्य रेल्वेने आता इमारतीच्या आतील भागाकडेही लक्ष दिले आहे. या इमारतीचाच भाग असलेल्या तिकीट बुकिंग कार्यालयाचा परिसर स्टार चेंबर या नावाने ओळखला जातो. या ‘स्टार चेंबर’चे तारे चमकावण्यासाठी मध्य रेल्वेने या भागात साफसफाई करण्याबरोबरच या भागातील दिव्यांची रचना बदलली आहे. त्यामुळे या ‘स्टार चेंबर’ला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.

सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन समोरील तिकीट बुकिंग कार्यालय स्टार चेंबर म्हणून ओळखले जाते. नियो ग्यॉथिक शैलीतील खांब, त्यावरील कोरीव काम आणि ताऱ्यांनी झळाळून उठणारे छत अशा उत्कृष्ट रचनेमुळे हे स्टार चेंबर स्थापत्य विशारदांच्या अभ्यासाचाही विषय आहे. या भागात रेल्वेच्या तिकीट खिडक्या, एटीव्हीएम यंत्रे आणि सीओ-एटीव्हीएम यंत्रे आहेत. याआधी या यंत्रांच्या तारा, स्टार चेंबरमध्येच लटकलेल्या दिसत होत्या. तसेच अपुऱ्या प्रकाशयोजनेमुळे स्टार चेंबरचे सौंदर्य झाकोळले जात होते.

मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी ही बाब लक्षात घेऊन तातडीने स्टार चेंबरला गतवैभव प्राप्त करून देण्याबाबत सीएसटी स्थानकाचे स्थानक संचालक शिवाजी सुतार यांना सूचना केल्या. युरोपमधील अनेक स्थानकांच्या धर्तीवर स्टार चेंबरलाही झळाळी देण्यासाठी एटीव्हीएम व एटीएम यंत्रांच्या तारा झाकणे, त्या झाकल्यानंतर रंगसंगतीनुसार रंगसफेदी करणे, खांब व छत यांवरील कोरीव काम दिसेल अशी प्रकाशयोजना करणे ही कामे हाती घेण्यात आली. आधी या भागात २५० व्ॉटचे ५० दिवे होते, त्या जागी आता केवळ २५ लाख रुपयांमध्ये १५ व्ॉटचे २६० दिवे लावण्यात आले आहेत. विजेच्या बचतीतून ही रक्कम चार वर्षांमध्ये वसूल होईल. हा बदल केल्यानंतर स्टार चेंबरचे सौंदर्य आणखी उठून दिसत आहे. असे बदल करणे आवश्यक आहे. आपले वैभव आपणच जपायला हवे, असे रवींद्र गोयल यांनी सांगितले.