गुजरातच्या सिल्वासा येथे बोट उलटून मुंबईतील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. येथील दुधनी तलावात मंगळवारी संध्याकाळी हे पर्यटक बोटीतून नजीकच्या एका गावात जात असताना ही घटना घडली. यावेळी बोटीत एकूण ३० जण होते. हे सर्वजण मुंबईतील रहिवाशी असून यापैकी पाजणांचा मृत्यू झाला असून १९ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्यापही सहाजणांचा शोध सुरू आहे.  बिपीन शाह, पन्नाबेन शाह, सुनिता कोठारी, पल्लवी शाह, विना कमल भोला अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

हे सर्वजण दादरा-नगर हवेली येथे पर्यटनासाठी गेले होते. खानवेल गावातील एका रिसॉर्टमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. रिसॉर्टच्या मालकीच्या बोटीने ते दुधनी तलावातून खानवेल गावाकडे चालले होते, अशी माहिती स्थानिक अधिकारी प्रफुल्ल पटेल यांनी दिली.रिसॉर्टच्या मालकाने नवीन बोट घेतल्यानंतर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला याठिकाणी बोलावले होते. या बोटीचा हा पहिलाच प्रवास होता. मात्र, दुर्देवाने ही बोट तलावात उलटली. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांवर सध्या सिल्वासातील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.