रुग्णांच्या नातेवाईकांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना वैतागलेल्या निवासी डॉक्टर संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे तातडीने शस्त्रपरवाना देण्याची मागणी केली आहे. डॉक्टर संरक्षण कायद्यात दुरुस्ती करत हल्लेखोरांना ८ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्याचीही मागणी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने केली आहे. नांदेड सरकारी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. मागणांची पूर्तता करण्यासाठी मार्डने ३०मे पर्यंत मुदत दिली आहे.
नांदेड सरकारी रुग्णालयात शुक्रवारी रुग्णाच्या नातेवाईकांनी मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करत डॉक्टरांना संरक्षण देण्यास सरकार असमर्थ ठरत असेल तर त्यांनी शस्त्र बाळगण्यासाठी शस्त्रपरवाने मंजूर करावे, अशी संतप्त मागणी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. तसेच, डॉक्टरांच्या संरक्षणासाठी रुग्णालयात सशस्त्र सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही मार्डने केली आहे. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी असलेला महाराष्ट्र मेडिकल सर्विसमेन प्रोटेक्शन अ‍ॅक्ट सक्षम करण्यासाठी त्यात दुरुस्ती करत डॉक्टरांवरील हल्ल्यासाठी ८ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी मार्डतर्फे करण्यात आली आहे. ८ वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्य़ात आरोपीला जामीन मिळत नाही, त्यामुळे नागरिक डॉक्टरांवर हल्ला करण्यास धजावणार नाही, असेही मार्डचे म्हणणे आहे. रुग्णालय परिसरात रुग्णाबरोबर केवळ दोनच नागरिक पाठविण्याच्या नियमाची काटेकोर अमलबजावणी व्हावी, अशी मागणीही मार्डने केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मार्डने ३० मे २०१६ पर्यंतची मुदत दिली आहे.