रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता; पालिकेकडून जोरदार मोहीम

मुंबईसह राज्यभरात डेंग्यूू, हिवताप आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मुंबईत प्रामुख्याने तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत २९६ डेंग्यूूचे रुग्ण आढळून आले असून यांपैकी १५ ते २९ वयोगटातील १५५ मुलगे आणि ३८ मुलींचा समावेश आहे.

एडिस, इजिप्सी या डासामुळे डेंग्यूू बळावतो. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून झोपडपट्टी आणि डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये तपासणी केली जात आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३२८७ संशयित डेंग्यूचे आणि डेंग्यूची लक्षणे असलेले ३९७७ रुग्ण दाखल झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे येत्या दिवसात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून २०१५च्या सप्टेंबर महिन्यात २४८ डेंग्यूचे रुग्ण वाढून या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत डेंग्यूचे रुग्ण २९६ पर्यंत पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात आले आहे.

वरळी कोळीवाडय़ात थैमान

वरळी कोळीवाडय़ात डेंग्यूूमुळे दुर्वेश वरळीकर या १८ वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून वाल्मीकी चौक भागातील तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागात कायम घाणीचे साम्राज्य असते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय नाही, कचरा उचलण्यासाठी पालिकेची कचरा गाडी येत नसल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. तर सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीची दुर्दशा झाली आहे. वाल्मीकी चौकातील झोपडपट्टीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे कोळीवाडय़ातील मुकादम या गृहस्थांनी सांगितले. तर येथे घरांत दिवसेंदिवस पाणी साठवून ठेवले जाते, त्यामुळे डास आणि साथीचे आजार फैलावतात असे या भागात आरोग्य केंद्र असणाऱ्या डॉ. राहुल सौदागर यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाय

  • वातानुकूलन यंत्र, फ्रिज वेळोवेळी स्वच्छ करावा.
  • मनी प्लांट, फ्लॉवरपॉटमधील पाणी वेळोवेळी बदलावे
  • जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट आदी भंगार घरातून हद्दपार करावे.
  • घराच्या खिडक्यांना डासप्रतिबंधक जाळ्या बसवून घ्याव्यात.