८ हजार ७४४ नोटिसा, तर २० लाखांची दंड वसुली

पावसाच्या आगमनाबरोबर डेंग्यूच्या अळ्या शोधण्यासाठी पालिकेची पथके कार्यरत होतात. गेल्या साडेसहा महिन्यात मुंबईत ७,५८६ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून केवळ जुलै महिन्याच्या १५ दिवसांत २२८३ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत जुलै महिन्यात डेंग्यूच्या अळ्या सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई न करणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाईतून पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून २० लाखांची वसूली करण्यात आली आहे.

१ जानेवारी ते १५ जुलै या साडे सहा महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ५८६ ठिकाणी ‘एडिस इजिप्ती’ या डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्या. तर २ हजार ६७४ ठिकाणी मलेरिया वाहक ‘नॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.गेल्या साडेसहा महिन्यात डेंग्यू नियंत्रणाच्या दृष्टीने ६२ लाख ४३ हजार ५९७ गृहभेटी देण्यात आल्या असून ८ हजार ७४४ नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटीसा प्रामुख्याने पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे या कारणांसाठी देण्यात आल्या आहेत. या कालावधीदरम्यान २० लाख ४ हजार ६०० रुपये एवढा दंड महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे वसूल करण्यात आला आहे, असेही नारिंग्रेकर यांनी सांगितले.

खबरदारी अशी..

घराजवळील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंटय़ा, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरीत नष्ट कराव्यात, असेही आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याने केले आहे.

वेगवान वाढ

या डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान ३ आठवडय़ांचे असते. या तीन आठवडय़ांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होत असतात. हे डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.