प्रिमियम गाडीच्या चक्रवाढ तिकीट दराचा गणेशोत्सवाच्या निमित्ताने  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी घेतला आह़े त्यामुळे यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदाच कोकणवारी करणारी वातानुकूलित डबलडेकर प्रिमियम गाडी अजूनही बरीच रिकामीच आहे. गाडीचे मोजकेच थांबे हेही प्रवाशांनी पाठ फिरविण्याचे एक कारण असल्याचे अधिकारी सांगतात.
गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेने १४४ जादा फेऱ्या सोडल्या असून त्यापैकी काही प्रिमियम गाडय़ा आहेत. या गाडय़ांच्या तिकिटाचा दर मागणीनुसार आणि प्रवासाची तारीख जवळ येईल त्यानुसार वाढतो. त्यामुळे या ट्रेनच्या पाच तिकिटांसाठी काही प्रवाशांना १९ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागली़
या पाश्र्वभूमीवर वातानुकूलित डबलडेकर गाडीही प्रिमियम तत्त्वावर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्यावर प्रवाशांमध्ये साशंकता होती. मात्र तरीही कोकणात जाण्यासाठी एक नवीन गाडी चालवण्याच्या निर्णयाचे स्वागत प्रवासी करणार का, याबाबतही कुतूहल होते. पण गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्यावर काही क्षणांतच या गाडीला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद असल्याचे जाणवले. या गाडीची कणकवलीपर्यंत उपलब्ध असलेली सर्व तिकिटे आरक्षित झाल्याचे चित्र आहे. तर करमाळीपर्यंतची तिकिटे अद्यापही आरक्षित होणे बाकी आहे.
डबलडेकर वातानुकूलित गाडीत ९६० आसने उपलब्ध असून १९ ऑगस्ट रोजी तीन वाजेपर्यंत डबलडेकर एक्सप्रेसच्या २२ ऑगस्टच्या ८५५ जागांचे आरक्षण झाले होते, २४, २६ आणि २८ ऑगस्ट रोजीच्या गाडय़ांमध्ये प्रत्येकी ८५०, ७४० आणि ६४६ जागा आरक्षित झाल्या आहेत.

येथे थांबा नाही
या गाडय़ांना रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, वैभववाडी, सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात आलेले नाही. मात्र कोकणातील बहुतांश प्रवासी याच स्थानकांवर उतरतात.