मरिन ड्राइव्हवरील वेगाच्या स्पर्धेचा परिणाम; नाकाबंदीदरम्यानची घटना

मुंबईतील ‘राणीचा हार’ समजला जाणाऱ्या मरिन ड्राइव्हवर वेगाच्या बाबतीत वाहनांची जोरदार स्पर्धा सुरू असून पोलिसांच्या नाकाबंदीनंतरही त्यात उतार होताना दिसत नाही. मंगळवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत खासगी गाडी चालविणाऱ्या वाहनचालकाने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ मोहिमेवर तैनात असलेल्या पोलिसालाच उडविल्याची घटना घडली. या हवालदाराच्या पायाला फॅ्रक्चर झाले असून त्यांना शरीरावर अन्य ठिकाणी जखमाही झाल्या आहेत. मद्यप्राशन करून वेगाशी स्पर्धा करणाऱ्या या तरुणाची जामिनावर सुटकाही झाली.

मंगळवारी रात्री नेताजी सुभाषचंद्र मार्गावर मफतलाल बाथजवळ मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी बॅरिकेड लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दक्षिण वाहिनीवर एक इंडिका गाडी भरधाव                 वेगात आली. पोलिसांनी या गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही गाडी थांबली नाही, तेव्हा नाकाबंदीच्या स्थळी तैनात असलेल्या काशीनाथ भोये या पोलीस हवालदाराला जोरदार धडक दिली तसेच पोलिसांच्या गस्त वाहनाला जाऊन ही गाडी थडकली. पोलिसांनी तातडीने गाडीत बसलेल्या चालकाला ताब्यात घेतले. त्या वेळी चालकासोबत आणखी दोन व्यक्तीही गाडीत होत्या. चालकाची रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्याने मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले. किरण गौडा (२२) असे या चालकाने नाव असून तो गिरगाव चौपाटीहून ग्रँट रोडला जात असल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी सांगितले. गौडा हा खेतवाडी येथे राहणारा असून तो खासगी गाडय़ा चालवतो.

दरम्यान, जखमी भोये यांना गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले असता, त्यांच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. गौडाची जामिनावर सुटका झाली आहे. या अपघातामुळे नरिमन पाँइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यान बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या वाढत असलेल्या घटना पुन्हा अधोरेखित झाल्या असून त्यावर चाप लावण्यासाठी पोलिसांना आणखी कठोर पावले उचलावे लागणार आहेत.