तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या वलप गावामध्ये विंधनविहिरीतील (बोअरवेल) दूषित पाण्यामुळे डायरियाच्या साथीची लागण झाली असून यात मुकेश शर्मा (वय ६) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावातील ३१ जणांना डायरियाची बाधा झाली आहे. यातील नऊ जणांवर पनवेलच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील बाधितांवर घरीच उपचार सुरू केले आहेत. साथीमागचे नेमके कारण अद्याप आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. ही साथ नेमकी डायरिया आहे की गॅस्ट्रो, याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वलप गावात अनेक विंधनविहिरी आहेत. गावाच्या वेशीवर १५ खोल्यांची चाळ बांधली आहे. यातील रहिवाशी विंधणविहिरींचे पाणी प्यावे लागते. त्या पाण्यातूनच ही लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपासून येथील बालकांना जुलाब व उलटय़ा सुरू झाल्या. याबाबत सरकारी यंत्रणेला कोणतीही माहिती नव्हती. काहींनी आपल्या मुलांना तसेच कुटुंबातील इतरांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नवीन पनवेल येथील डॉक्टर मोहीते यांच्या साई चाईल्ड केअर क्लिनीकमध्ये काही बालकांवर उपचार सुरु होते.