डॉ. रघुराम राजन यांची खंत

आपण आर्थिक विकास साधला असला तरी देशाची एकंदर क्षमता लक्षात घेता तो कमीच आहे, अशा शब्दांत रिझव्‍‌र्ह बँकेचे मावळते गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबतची खंत व्यक्त केली आहे.

रघुराम राजन हे येत्या ४ सप्टेंबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या पदाची सूत्रे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे घेणार आहेत. अर्थप्रगतीची फुटपट्टी मानली जाणाऱ्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचा दर बुधवारी जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत असतानाच राजन यांची नाराजी मध्यवर्ती बँकेच्या २०१५-१६ च्या वार्षिक अहवालातून व्यक्त झाली आहे. देशाच्या आर्थिक विकासवाढीची चिन्हे सध्या दिसत असली तरी ती भारताची क्षमता असलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे, असे निरीक्षण राजन यांनी या अहवालात नोंदविले आहे. अर्थव्यवस्थेची गती विस्तारत असल्याचे काहींना वाटत असले तरी ती अपेक्षेपर्यंत नाही, अशी खंत व्यक्त करीत, मार्च २०१७ पर्यंत देशाचा विकास दर ५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. क्षमतेच्या कमी वापरामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक रोडावल्याचे नमूद करत राजन यांनी या अहवालात काही क्षेत्रातील सार्वजनिक-सरकारी गुंतवणुकीची प्रक्रिया अद्यापही संथ असल्याचे म्हटले आहे. व्याजदर कपात खुलेपणाने होण्यासाठी कंपन्यांची भांडवली स्थितीही सुधारायला हवी, असे त्यांनी नमूद केले आहे.

देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांवर आर्थिक ताण दिसत असला तरी उद्योग, लघू उद्योग-व्यवसाय हेही तुलनेत काहीसे चिंताजनक स्थितीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्राहक क्रयशक्ती वाढण्यासाठी यंदाचा दमदार मान्सून व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ हे पथ्यावर पडण्याची शक्यता त्यात वर्तविण्यात आली आहे.

गव्हर्नरपदाच्या कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण जाहीर करताना राजन यांनी व्याजदर स्थिर ठेवले होते. पटेल हेही व्याजदराबाबतचे धोरण कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत राजन यांनी त्यांचे स्वागत केले होते.

देशाच्या आर्थिक विकास वाढीची चिन्हे सध्या दिसत असली तरी ती भारताची क्षमता असलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे. अर्थव्यवस्थेची गती विस्तारत असल्याचे काहींना वाटत असले तरी ती अपेक्षेपर्यंत नाही. मार्च २०१७ पर्यंत देशाचा विकास दर नक्कीच ५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचेल.

– रघुराम राजन, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक