निवडणुकीच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, लहान-मोठे उद्योजक, व्यावसायिक यांनी आपली ‘गंगाजळी’ निवडणुकीकडे वळवल्याने दिवाळी अंकांसाठी जाहिराती देताना त्यांनी हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम दिवाळी अंकांच्या आर्थिक उलाढालीवर झाला असून त्यामुळे दिवाळी अंकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  
मराठीत ३५० ते ४०० दिवाळी अंक प्रकाशित होतात. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये फक्त मराठीतच दिवाळी अंकांची ही परंपरा गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास किमान ४० ते ५० अंक बाजारात दाखल झालेले असतात. यंदा हे प्रमाण बरेच कमी आहे. आचारसंहितेमुळे यंदा शासकीय, निमशासकीय तसेच शासनाची महामंडळे, उपकंपन्या यांच्या जाहिराती मिळण्यास अडचणी आल्या. तर मोठे बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, काही कंपन्या यांची ‘गंगाजळी’ निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि नेत्यांकडे गेल्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम दिवाळी अंकांच्या जाहिरातींवर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात नेमके सरकार कोणाचे येणार याची शाश्वती नसल्याने काही कंपन्यांनीही जाहिराती देण्यासाठी यंदा हात आखडता घेतला आहे. अनेकजण अजून जाहिराती मिळतील अशा आशेवर असून त्यामुळे छोटे दिवाळी अंक काढणाऱ्या काही जणांनी अद्यापही मुद्रणालयात आपला अंक छपाईसाठी पाठवलेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

जाहिरातींवर परिणाम
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा परिणाम दिवाळी अंकांच्या जाहिरातींवर झाला आहे. राजकीय पक्ष किंवा नेते यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींचा ओघ आटलाच पण या मंडळींच्या माध्यमातून व संपर्कातून आम्हाला  ज्या काही जाहिराती मिळायच्या त्यावरही यंदा परिणाम झाला.-शिवाजी धुरी (प्रमुख कार्यवाह ‘दिवा प्रतिष्ठान’)

उठाव नाही
निवडणूक निकाल लागल्यानंतर दिवाळी अंकांची बाजारपेठ उठाव घेईल, अशी आशा आहे.
-हेमंत बागवे (बी.डी. बागवे आणि कंपनी)