पाकिस्तानात कैद करण्यात आलेला मुंबईचा अभियंता हमीद अन्सारी याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारी पत्रकार झीनत शहजादी हिच्या सुटकेचे त्याची आई फौजिया हिने स्वागत केले असून त्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

‘झीनत व माझा मुलगा यांच्यापैकी कुणाची आधी सुटका व्हावी असे मला आधी विचारण्यात आले होते, त्या वेळी झीनतची आधी सुटका व्हावी, असे मी म्हटले होते. कारण माझ्या मुलाच्या सुटकेच्या प्रयत्नात तिचे अपहरण झाले त्यामुळे तिला सामोरे जावे लागलेल्या प्रसंगास मीच जबाबदार आहे, असे मला नेहमीच वाटत राहिले,’  असे फौजिया यांनी सांगितले. ‘ऑगस्ट २०१५ मध्ये झीनतशी माझे शेवटचे बोलणे झाले होते व त्याआधी आम्ही सतत संपर्कात होतो,’ असे सांगून त्या म्हणाल्या, की ‘ब्रिटनमधील मानवी हक्क कार्यकर्ते जस उप्पल यांनी माझा परिचय शहजादी हिच्याशी करून दिला. नोव्हेंबर २०१२ मध्ये माझा मुलगा अफगाणिस्तानात जाण्यासाठी गेला, तेव्हा तो परतला नाही. त्यानंतर शहजादी त्याचा शोध घेत राहिली. हमीदच्या सुटकेसाठी ती लाहोर ते इस्लामाबाद नेहमी चकरा मारीत असे.

झीनत माझ्या प्रकृतीची सतत चौकशी करीत असे व काळजी करू नका, मी तुमच्या मुलास सोडवीन, असा दिलासा देत असे.  प्रत्येक सुनावणीनंतर ती रात्री घरी पोहोचल्यानंतर मला फोन करीत असे, मगच मी झोपायला जात असे. आता शहजादीची सुटका झाल्याने खूपच आनंद झाला आहे. फौजिया सध्या मुंबईच्या महाविद्यालयात अध्यापन करतात.