* नोव्हेंबर महिन्यात मुलुंड स्थानकात सरकता जिना सुरू होणार
* पुढील दोन वर्षांत किमान २४ सकरते जिने बसवण्याचे नियोजन
मुंबईकर प्रवाशांच्या आयुष्यातील काही ‘चढ’ सोपे करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध स्थानकांवर सरकते जिने बसवण्याची योजना आखली आहे. मात्र या योजनेतील शेवटचा सरकता जिना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विक्रोळी स्थानकात कार्यान्वित झाला. त्यानंतर तब्बल सव्वा वर्ष एकाही स्थानकावर एकही सरकता जिना लागला नव्हता. मात्र आता हे सरकते जिने धडाक्यात पुनरागमन करणार असून नोव्हेंबर महिन्यापासून दर महिन्याला किमान एक, या मार्गाने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर सरकते जिने बसणार आहेत. या माळेतील पहिला सरकता जिना नोव्हेंबर महिन्यात मुलुंड स्थानकात सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मध्य रेल्वेमार्गावर जून २०१३ रोजी ठाणे स्थानकात पहिला सरकता जिना बसवण्यात आला होता. त्यानंतर डोंबिवली, दादर, कल्याण आणि विक्रोळी या स्थानकांत सरकते जिने बसवण्यात आले. प्रवाशांना या सरकत्या जिन्यांचा चांगलाच फायदा होत असून त्यामुळे स्थानकात रूळ ओलांडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विक्रोळी स्थानकात बसवण्यात आलेल्या सरकत्या जिन्यानंतर मुंबई उपनगरीय विभागातील एकाही स्थानकात सरकता जिना बसवण्यात आला नव्हता.
मात्र मध्य रेल्वे आता सरकत्या जिन्यांबाबत ठोस योजना घेऊन पुन्हा येत आहे. या योजनेनुसार मे २०१६पर्यंत १० सरकते जिने विविध स्थानकांत बसवण्याचे नियोजन झाले असून त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मुलुंड स्थानकात पहिला सरकता जिना बसणार आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस, विद्याविहार, भांडुप, उल्हासनगर, बदलापूर आणि घाटकोपर या स्थानकांत जिने बसवले जातील. त्याशिवाय पुढील दोन वर्षांत महिन्याला किमान एक, या दराने तब्बल २४ सरकते जिने बसवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर
पुढील दोन वर्षांत खालीलप्रमाणे सरकते जिने लागतील

मुलुंड (१), लोकमान्य टिळक टर्मिनस (४), विद्याविहार (१), भांडुप (१), उल्हासनगर (१), बदलापूर (५), घाटकोपर (३), दादर (६), ठाणे (४), कल्याण (२), लोणावळा (२)