नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातून मुंबईत देहविक्रीसाठी आणलेल्या एका १८ वर्षीय तरुणीची समाजसेवा शाखेने सुटका केली. तिला ३ लाखांत विकण्याचा सौदा करण्यात आला होता.
ही तरुणी इंदोर शहरात राहत असून जावेद नावाच्या तरुणाने मुंबईत काम देण्याचे आश्वासन तिला दिले होते. मुंबईत एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे, असे जावेदने सोनमच्या कुटुंबीयांना सांगितले आणि तिला मुंबईत आणले. प्रत्यक्षात जावेदने ३ लाखांत देहविक्री करणाऱ्या टोळीबरोबर तिचा सौदा केला होता. गुरुवारी तिला गिरगाव चौपाटीजवळ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी सापळा लावून या तरुणीची सुटका केली आणि जावेदला पिटा कायद्यांतर्गत अटक केली. पुढील तपासासाठी जावेदला गावदेवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जावेदला २४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.