राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव शिवसेनेने सुचविले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तर आपले गुरू असल्याचे पंतप्रधान मोदी यांनीच सांगितले आहे. पवार यांना पद्मविभूषणही दिल्याने कोणाच्या मनात काय येईल, हे मला माहीत नाही, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे, या मागणीचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला. शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भागवत हे राष्ट्रपती का नको?

अनेक वर्षांनी हाती सत्ता आली असल्याने कणखर व खंबीर राष्ट्रपती असले पाहिजेत. हिंदूुराष्ट्र संकल्पनेसाठी मोहन भागवत हे राष्ट्रपती का नसावेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना राज्यपालपदी नियुक्ती केली जाते, मग या संघटनेच्या प्रमुखास देशाचे राष्ट्रपती करायला हरकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

तूर खरेदीबाबत शिवसेना आक्रमक

तूर खरेदीच्या मुद्दय़ावरही शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद दिला, असे ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत सर्वात महाग दराने पेट्रोल-डिझेल विकणे हे चुकीचे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.