परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्हय़ाचा हेतू आणि तो सिद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने खुनाच्या प्रकरणात चार जणांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप रद्द करीत त्यांची निर्दोष सुटका केली.
न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठाने तानाजी राऊत, दत्ता गायकवाड, सनी शिंदे आणि गोरख जाधव या चार आरोपींची एका सराफाच्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. चेंबूर येथील ‘वंदना ज्वेलर्स’चा मालक बाबुलाल जैन यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी २००४ रोजी विक्रोळी परिसरात एका चोरलेल्या टाटा सुमो गाडीत गस्तीदरम्यान पोलिसांना सापडला होता.
जैन यांच्या छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी पोलिसांना तानाजीचा रक्ताने माखलेला शर्ट सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती.