गौरी-गणपतीच्या विसर्जनाचे काम आटोपून घोडबंदर मार्गावरून एकाच मोटारसायकलवर स्वार होऊन निघालेल्या चौघा तरुणांचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी रात्री उशिरापर्यंत कापूरबावडी पोलिसांकडे ठोस माहिती नव्हती.
सुसाट वेगाने निघालेल्या मोटारसायकलस्वार तरुणांनी एका ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. अर्जुन दशरथ गायकवाड (२०), नीलेश मधुकर थोरात (२३), पंकज धर्मा गावित (२१), कृष्णा रघुनाथ महाले (२३), अशी अपघातात मृत पावलेल्या चौघा तरुणांची नावे आहेत. हे तरुण ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात राहत होते. पातलीपाडा परिसरात गणेशमूर्ती विसर्जनाचे काम ते करीत होते. वेगवेगळ्या तलावांवर तसेच खाडीकिनारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी या तरुणांना मानधन मिळायच़े  शुक्रवारी पहाटे काम संपवून चौघे एकाच मोटारसायकलवरून कापूरबावडी परिसरात न्याहरी करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याने हा अपघात नेमका कसा झाला, या अपघाताविषयी गूढ आणखी वाढले आहे. चौकशीनंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. कदम यांनी दिली.