नांदेडहून किनवटच्या प्रवासातील वाढत्या तापमानाचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हेलिकॉप्टरला फटका बसला आणि ते शुक्रवारी सकाळी तेलंगणामध्ये वळवावे लागले. थोडय़ा वेळाने मात्र हेलिकॉप्टर नांदेडमध्ये सुखरूपपणे उतरले.
नांदेड जिल्ह्य़ात सध्या ४५ ते ४६ डिग्री सेल्सियस तापमान असून, या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. यामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्याशिवाय पर्याय नव्हता, असे राज्याचे हवाई वाहतूक विभागाचे संचालक कॅप्टन संजय कर्वे यांनी सांगितले. नांदेडहून सकाळी ११च्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. किनवटकडे जात असताना पुढील वातावरण उड्डाणाकरिता योग्य नव्हते. यामुळेच वैमानिकाने तेलंगणाच्या दिशेने हेलिकॉप्टरची दिशा बदलली. हेलिकॉप्टरची रचना ही ४६ ते ४७ डिग्री सेल्सियसपर्यंतच उड्डाणासाठी योग्य मानली जाते. नांदेड परिसरात हेलिकॉप्टरला उड्डाणाकरिता कमाल तापमानाच्या आसपास तापमान असल्याने उड्डाण करताना काही मर्यादा आल्या होत्या. वैमानिकाने स्वत:हून निर्णय घेऊन ते तेलंगणामध्ये वळविले होते. सुरक्षित मार्गाने थोडय़ाच वेळात हेलिकॉप्टर नांदेडकडे परत आले, अशी माहिती कॅप्टन कर्वे यांनी दिली.