सत्तेत येताच वित्तीय परिस्थितीची श्वेतपत्रिका सादर करण्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असता, फक्त सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने सत्ताधारी भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आता पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या अधिवेशनात गेल्या दहा वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका सादर केली जाणार आहे. फक्त राष्ट्रवादीकडील खाती लक्ष्य न होता काँग्रेसकडील खात्यांच्या कारभारांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.  
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वित्तीय परिस्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे. १९९९ मध्ये सत्तेत आल्यावर काँग्रेस आघाडी सरकारने युती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. आता आघाडी सरकारच्या गैरकाराभारांवर प्रकाश टाकणारी श्वेतपत्रिका मुनगंटीवार सादर करणार आहेत. सध्या मंत्रालयात प्रत्येक खात्याकडून माहिती संकलित केली जात आहे. वित्त खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्थसंकल्पाबरोबरच श्वेतपत्रिका तयार करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे लागते आहे.
आघाडी सरकारच्या काळात वित्त खाते हे राष्ट्रवादीकडे होते. फक्त वित्त खात्यावर प्रकाश न टाकता अन्य खात्यांत वित्तीय गोंधळ किंवा कशा प्रकारे उधळपट्टी करण्यात आली याची माहिती सादर केली जाईल.
छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधातील चौकशीमुळे फक्त राष्ट्रवादीचे नेते चौकशीत अडकले आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांनी भूषविलेल्या खात्यांनाही लक्ष्य करण्याची भाजपची योजना आहे. कारण भाजपचा काँग्रेस हा प्रतिस्पर्धी असल्याने काँग्रेसचे नेते अडचणीत यावेत, असा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेबरोबर युती होण्यापूर्वी भाजप सरकार राष्ट्रवादीच्या टेकूवर टिकून होते. यामुळेच तेव्हा वित्त खाते भूषविलेल्या राष्ट्रवादीला अंगावर घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळले होते.
दशा आणि दिशा दर्शविण्यासाठी श्वेतपत्रिका – मुनगंटीवार
केवळ राजकीय हेतूने नव्हे तर राज्याच्या तिजोरीची दशा आणि पुढील दिशा निश्चित करण्याकरिता श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तिजोरी रिती होण्यामागची कारणे, निधीचा पुरेपूर वापर झाला का, विकास कामांवरील खर्च कमी होणे याची कारणे तपासली जाणार आहेत. तसेच पुढील काळात सरकारने कोणती धोरणे स्वीकारावीत, यावरही प्रकाश या निमित्ताने टाकला जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.