हार्बर मार्गाची सेवा आता अंधेरीऐवजी गोरेगावपर्यंत विस्तारणार असली, तरीही या मार्गावर ओशिवरा स्थानक अद्याप तरी उभे राहणार नसल्याचे महाव्यवस्थापक हेमंतकुमार यांनी स्पष्ट केले. ओशिवरा स्थानक उभारण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाला फार वेळ लागणार नाही. मात्र या स्थानकासाठी लागणाऱ्या इतर पायाभूत सुविधा स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांच्याकडून उभ्या राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
हार्बर सेवा गोरेगावपर्यंत विस्तारीत करण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत संपून गोरेगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान हार्बर सेवा सुरू होणार आहे. या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरही ओशिवरा स्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रलंबित आहे.
यासाठी पश्चिम रेल्वेने हिरवा कंदील दाखवला असला, तरी रेल्वेस्थानकाव्यतिरिक्तची जागा राज्य सरकार अथवा पालिका यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे वाढणाऱ्या गर्दीचा विचार करता पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र ही प्रक्रिया लांबणारी असल्याने हे सध्या शक्य नसल्याचे हेमंतकुमार म्हणाले.