मुंबईच्या हाजी अली दर्ग्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कुराणमधील गोष्टींचे समर्थन करणारा असल्याची प्रतिक्रिया हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सलीम खान यांनी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने काल हाजी अली दर्ग्यातील मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला होता. या पार्श्वभूमीवर सलीम खान यांनी शनिवारी ट्विटरवरून न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले.
मझार किंवा दर्ग्याच्या ठिकाणी स्त्री-पुरूष दोघांनाही जाण्याचा हक्क आहे. इस्लाम धर्मात कोणत्याही प्रकारचा लिंगभेद अस्तित्वात नाही. मुल्ला आणि मौलवी यांनीच इस्लामसारख्या साध्या धर्माला जटील बनवले.  इस्लाम धर्मात असलेला फतवा म्हणजे आदेश असतो, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. फतवा म्हणजे इस्लामी विद्वानांचे मत असते. त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निर्णय योग्य आहे. हा निर्णय हदीस आणि कुराणमधील गोष्टींचे समर्थन करणारा आहे. चांगला मुस्लिम बनण्यासाठी सर्वप्रथम चांगली व्यक्ती होणे गरजेचे असते, असे सलीम खान यांनी म्हटले.
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक म्हणावा लागणार आहे. यामुळे हाजी अली दर्ग्यामध्ये आता स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वांना दर्ग्याच्या मझारपर्यंत प्रवेश मिळणार आहे. डॉ. नूरजहाँ मिर्झा यांनी ट्रस्टच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला.