महापालिकेने मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दादर रेल्वे स्थानक आणि न्हावा शेवा सागरीसेतूस त्यांचे नाव द्यावे, या नगरसेकांच्या मागणीने गुरुवारी पालिका सभागृह दणाणून गेले.
बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महापौर सुनील प्रभू यांनी गुरुवारी पालिका सभागृहाची विशेष सभा बोलावली होती. या सभेत सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहावे यासाठी मुंबईमध्ये त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे. तसेट न्हावा-शेवा सागरीसेतू आणि प्रस्तावित सागरी मार्गालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करून सभागृह नेते यशोधर फणसे यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
शिवसेनाप्रमुखांनी गेली ४२ वर्षे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदान गाजविले. याच मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच मैदानावर त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली. नवी मुंबईत होऊ घातलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांनी केली.
शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहताना मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वसामान्य मराठी माणसांच्या मदतीला धावून जाणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे मराठी माणूस पोरका झाला आहे, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादरच्या इंदू मिलवर उभारण्यात येणार आहे. अशाच विशाल जागेमध्ये शिवसेनाप्रमुखांचेही स्मारक उभारावे, अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली. तर इंदू मिलच्याच जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारावे, अशी थेट मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांनी केली. तसेच दादर रेल्वे स्थानकाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-दादर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे, असे काँग्रेसच्या नगरसेविका चनैना सेठ यांनी सांगितले.
विविध पक्षांच्या नगरसेवकांनी केलेल्या मागण्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सूचित केले.