शीतपेटीच्या नावाखाली जादा दराने दुधाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वैधमापन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे धास्तावलेल्या ठाणे शहरातील दूध व्यावसायिकांनी बुधवारपासून महानंद, गोकुळ, अमूल, वारणा आणि मदर डेअरी या पाच प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  
ठाणे शहरात दररोज विविध प्रकारच्या ब्रॅण्डचे सुमारे दहा लाख लिटर दूध विक्रीसाठी येते. त्यापैकी साडे तीन ते चार लाख लिटर दूध या पाच ब्रॅण्डचे असते. या ब्रॅण्डच्या दुधाच्या विक्रीवर विक्रेत्यांना सुमारे एक ते दीड टक्के कमिशन मिळते. यामुळे शीतपेटीच्या नावाखाली विक्रेते जादा पैसे घेतात. तर या ब्रॅण्डव्यतिरिक्त उर्वरित दूध कंपन्या विक्रेत्यांना दुधाच्या विक्रीसाठी जास्त कमिशन देतात. यामुळे या दुधाच्या विक्रीवर विक्रेते जास्त पैसे घेत नाहीत. या पाच ब्रॅण्डच्या दुधावर विक्रेते जास्त पैसे आकारत असल्यामुळे वैधमापन विभागाने कारवाई सुरू करीत विक्रेत्यांवर केसेस दाखल केल्या. त्यामुळे बहिष्काराचे हत्यार उपसल्याची माहिती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली. ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्य ब्रॅण्डच्या दुधाची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलन पेटण्याची शक्यता
मुंबई, नवी मुंबई, पनवेल आदी शहरांमधील दूध विक्रेत्यांनीही या दुधाच्या विक्रीवर बहिष्कार घालावा, याकरिता ठाण्यातील दूध विक्रेत्यांची संघटना तेथील दूध विक्रेत्यांशी संपर्क साधत आहे. यामुळे ठाण्याच्या  आसपासच्या शहरांमध्येही दूधकोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहेत मागण्या..
काही वर्षांपूर्वी दूध कंपन्यांनी डिझेलचा दर वाढल्याचे कारण पुढे करत सात ते आठ रुपयांपर्यंत दुधाच्या किमतीत वाढ केली. मात्र आता डिझेलचे दर १२ ते १४ रुपयांनी  कमी झाले असून, दूध खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या दरातही कंपन्यांनी चार रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे महानंद, गोकुळ, अमूल, वारणा आणि मदर डेअरी या पाचही प्रसिद्ध ब्रॅंडच्या कंपन्यांनी जनतेवर दुधाची दरवाढ न लादता विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दहा टक्क्य़ांनी वाढ करावी. त्यानंतरच या  बहिष्कार मागे घेण्यात येईल, अशी माहिती चोडणेकर यांनी दिली.