‘आयएनएस बेतवा’ला सुस्थितीत आणण्याचे आव्हान

दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर समुद्रामध्ये जाताना कलंडून दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘आयएनएस बेतवा’ या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेला कमीत कमी वेळात सुस्थितीत आणण्याचे आदेश नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी दिले आहेत. मात्र या युद्धनौकेला पुन्हा कार्यरत करणे हे नौदलासमोरचे आजवरचे सर्वात मोठे आव्हान आहे. तज्ज्ञांचे एक पथक बुधवारी नौदल गोदीस भेट देणार असून त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानंतर तिच्या दुरुस्तीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी रिअर अ‍ॅडमिरल दीपक बाली यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल लांबा यांनी मंगळवारी दुर्घटनाग्रस्त युद्धनौकेची पाहणी केली. दुरुस्तीचे काम वेगात पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पश्चिम मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर त्यांनी ‘आयएनएचएस अश्विनी’ या नौदल रुग्णालयास भेट देऊन तिथे उपचारार्थ दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एन. के. राय या नौसनिकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले.

[jwplayer TSJf2gHS]

मृत्युमुखी पडलेले नौसैनिक एन. के. राय आणि आशुतोष पांडे यांच्या पाíथवावर पुष्पचक्र वाहून मंगळवारी दुपारी नौसनिकांनी आदरांजली वाहिली. राय यांच्या पश्चात पत्नी व मुले तर पांडे यांच्यामागे आई व भाऊ असा परिवार आहे. या दोघांचेही मृतदेह बुधवारी विशेष विमानाने त्यांच्या मूळ गावी मध्य प्रदेशातील सतना व उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नेण्यात येणार आहेत.

दुर्घटनाग्रस्त युद्धनौकेला पोहोचलेल्या हानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम तज्ज्ञ समितीतर्फे मंगळवारी दिवसभर सुरूच होते. याशिवाय नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयातून तज्ज्ञांचे आणखी एक पथक बुधवारी मुंबईत दाखल होणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देखभाल- दुरुस्तीदरम्यान युद्धनौकेवरील अनेक यंत्रणा बाजूला काढून ठेवण्यात आलेल्या असल्या तरी समुद्राचे खारेपाणी मोठय़ा प्रमाणावर आत घुसल्यामुळे युद्धनौकेची दुरुस्ती करून तिला सुस्थितीत आणणे कडवे आव्हान असेल. गेल्या चार वर्षांमध्ये नौदलातील अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहेत. या पाश्र्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त युद्धनौका पुन्हा सुस्थितीत आली तर नौसनिकांसाठीच नव्हे तर देशासाठीही तो चांगला संदेश असेल. त्यामुळेच हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय नौदलाकडून घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ‘आयएनएस सिंधुरक्षक’ आणि ‘आयएनएस िवध्यगिरी’ या अनुक्रमे पाणबुडी आणि युद्धनौकांना नौदल गोदीतच जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे नौदलाला लागलेले गालबोट अद्याप पुसले गेलेले नाही.

एक जण गंभीर ?

सोमवारी झालेल्या दुर्घटनेतील तीन नौसनिकांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर असून ते ‘आयएनएचएस अश्विनी’ या नौदल रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या संदर्भात वारंवार संपर्क साधूनही नौदलाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

मोठी हानी टळली

‘आयएनएस बेतवा’ची दुर्घटना घडली त्या वेळेस सुमारे शंभरच्या आसपास नौसनिक आणि गोदीतील कर्मचारी या युद्धनौकेवर होते, अशी माहिती मंगळवारी समोर आली. यातील बहुतांश जण आतमध्ये अडकले. युद्धनौका पाण्यात आडवी झालेली असताना आतमध्ये अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना बाहेर संपर्क साधणे यंत्रणेमुळे शक्य झाले. कर्मचारी व नौसनिक कुठे अडकले आहेत याची नेमकी माहिती मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आणि मोठी दुर्घटना टळली, असे सूत्रांनी सांगितले. सुमारे तीन तास पाणी वेगात उपसून कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविण्याची ही मोहीम सुरूच होती.

[jwplayer YAIUOjFy]