डेव्हिड हेडली याने गुरूवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या साक्षीत इशरत जहाँ ही तरूणी ‘लष्कर-ए-तोयबा’ची हस्तक असल्याचा खुलासा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. इशरत जहाँ कुटुंबियांच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी हेडलीच्या सर्व विधानांचे खंडन करत भाजप इशरत जहाँला दहशतवादी ठरविण्यासाठी इतका उतावीळ का आहे, असा प्रश्न विचारला. मुंबईवरील २६\११  हल्ल्यासंबंधीचा खुलासा करण्यासाठी सध्या डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली जात आहे. मात्र, त्यात अचानक इशरत जहाँप्रकरणाचा उल्लेख कसा काय आला?, सरकारी वकिलांनी हेडलीच्या तोंडून इशरत जहाँचे नाव वदवून घेतले आहे आणि आता त्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप वृंदा ग्रोव्हर यांनी केला.  इशरत जहाँच्या आई शमिमा कौसर यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, न्यायालयात जे सिद्ध व्हायचे होते, ते झाले आहे. मात्र, आता काही मोठ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी हे सगळे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. तर ईशरतची बहीण मुसरत हिनेदेखील आपली बहीण निर्दोष असल्याचे सांगत हेडलीच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई हल्ल्याच्या कटातील सुत्रधारांपैकी एक असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याची अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू असून, चौथ्या दिवशी हेडलीने इशरत जहाँप्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे केले . मुंब्रा येथील इशरत जहाँ ही तरूणी ‘लष्कर-ए-तोयबा’ची हस्तक होती. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या महिला विंगची सुसाईड बॉम्बर असलेल्या इशरतकडे मोदींना मारण्याची जबाबदारी होती. गुजरातमधील अक्षरधाम मंदिर देखील इशरतच्या निशाण्यावर होते, असे महत्त्वपूर्ण खुलासे हेडलीने केले आहेत.