जुन्याच योजनेला मुदतवाढ देण्याची सरकारवर नामुष्की

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील लाखो गरीब रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली राजीव गांधी आरोग्य योजनेचे नामांतर करून ती नव्या स्वरूपात आणण्याचा भाजप-शिवसेना युती सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. परिणामी जुन्याच योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना आघाडी सरकारच्या काळात कमालीची यशस्वी ठरली होती. मात्र या योजनेत काही त्रुटी असल्याचे कारण पुढे करीत युती सरकारने या योजनेमध्ये बदल करीत ती महात्मा ज्येतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून नव्या स्वरूपात आणण्याचा निर्णय घेतला. या योजनेबाबत विमा कंपन्यांनी केलेला करार संपत आल्याने विमा हप्त्याची रक्कम वाढवून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

विमा कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

२१ नोव्हेंबरपासून ही योजना अमलात येणार होती. मात्र विमा कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. परिणामी नव्या योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय व तांत्रिक कारणांमु़ळे विलंब लागणार असल्याने सध्याची राजीव गांधी जीवनदायी योजनाच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.