सहकार क्षेत्राच्या रूपात महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सिंहाचा वाटा राखणाऱ्या नागरी सहकारी बँकांवरील विचारमंथन ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर शुक्रवार, ३० जानेवारीला होत आहे. ‘मुंबई शेअर बाजारा’च्या सहयोगाने दुपारी ३ ते सायंकाळी ५ दरम्यान होणाऱ्या या उपक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा हे प्रथमच सहभागी होत आहेत.
नागरी सहकारी बँकांचे व्यवहार अधिक सुलभतेने होण्यासाठी ही एकदिवसीय परिषद होणार असून महाराष्ट्राचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे व मुकुंद एम. चितळे अ‍ॅण्ड कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर मुकुंद चितळे हेही या परिषदेत सहभाग नोंदवतील. राज्यातील आघाडीच्या सहकारी बँकांचे प्रतिनिधीही या परिषदेला उपस्थित असतील. नागरी सहकारी बँका व केंद्रीय अर्थराज्यमंत्री या निमित्ताने एकाच मंचावर एकत्रित येणार असून नागरी सहकारी बँकांतील समस्यांचा ऊहापोह या वेळी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. नागरी सहकारी बँक क्षेत्रातील अनुत्पादक मालमत्ता, कर्ज वितरण, शाखा विस्तार, माहिती-तंत्रज्ञानाची कास, खासगी व सार्वजनिक बँकांची स्पर्धा आदी अंगांनी या परिषदेत चर्चा होईल.
*परिषदेकरिता प्रवेश फक्त निमंत्रितांसाठीच.