पंढरपूर वारीदरम्यान शौचालयांअभावी होणाऱ्या घाणीच्या साम्राज्याची समस्या दूर करायची तर प्रीफॅब्रिकेटेड शौचालये हा त्यावर तोडगा नाही, तर वारक ऱ्यांना सहजतेने वापरता येईल अशी शौचालये उपलब्ध करून देण्याचे मत उच्च न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीत व्यक्त केले.
एवढेच नव्हे, तर ही समस्या राज्यात प्रत्येक धार्मिक सोहळ्यामध्ये निर्माण होत असल्याने ज्या धार्मिक सोहळ्यात ५० हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी होणार असतील अशा सोहळ्यांसाठी कुंभमेळ्यादरम्यान शौचालयाबाबत जी व्यवस्था उपलब्ध करण्यात येते ती उपलब्ध करून द्या, अशी सूचनाही न्यायालयाने सरकारला केली आहे.
शौचालयांअभावी पंढरपूर वारीदरम्यान आणि वारीनंतर पंढरपूरमध्ये घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच त्यामुळे आजही तेथे हाताने मैला साफ करण्यासारखी कुप्रथा अस्तित्वात असल्याची बाब जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. न्या. नरेश पाटील आणि न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस ही समस्या दूर करण्यासाठी प्रीफॅब्रिकेटेड शौचालये उभारण्यात येण्याचा आणि तो योग्य पर्याय असल्याचे पंढरपूर पालिकेच्या वतीने अॅड. सारंग आराध्ये यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु हा तोडगा नसल्याचे स्पष्ट करत कुंभमेळ्याचे उदाहरण दिले.