बिल्डरांच्या फायद्यासाठी मुंबईत मोनोरेल प्रकल्पाचा घाट घालण्यात आला, असा आरोप करत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोनोरेल प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोनोरेल्वे प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान, आजुबाजूच्या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणावर घरे खरेदी केली. त्यामुळे या भागातील जागांच्या किंमती गगनाला भिडल्या असून हा घटक बिल्डरांना फायदेशीर ठरल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. तसेच या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. मुळात मुंबईला मोनोरेलची गरज होती का आणि होतीच तर हा प्रकल्प नक्की कुठे झाला पाहिजे होता, याबाबतचे निकष प्रकल्प पूर्ण करताना धाब्यावर टांगण्यात आले. मोनोरेच्या रुपाने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुंबईकरांवर मोठा बोजा टाकला आहे. मोनोच्या पहिल्या टप्प्यासाठी १२०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १९०० कोटी खर्च झाला आहे. इतके करूनही प्रवाशांकडून या सेवेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
केवळ लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रचारासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने या प्रकल्पाचे उद्घाटन केले. उद्घाटनापासून आत्तापर्यंत किमान सातवेळा मोनोची सेवा खंडित झाली आहे आणि निवासी भागापासून दूर असलेल्या मोनोच्या स्थानकांमुळे येथील रहिवाशांना या सेवेचे कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे हा पांढरा हत्ती आणखी किती दिवस पोसायचा, असा सवाल करत किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.