माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ‘कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ या जुळ्या टॉवर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर गंभीर आर्थिक संकटामुळे कर्जाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे. ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल’च्या मुंबई खंडपीठाने या प्रकल्पासाठी पुनर्रचनेची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. नऊ महिन्यांत ही समायोजन प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार सादर झालेला प्रस्ताव लवादाकडून मान्य केला जात नाही किंवा दिवाळखोरी घोषित करीत नाही, तोपर्यंत या कंपनीविरोधात बँका, वित्त कंपन्यांना कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असेही याबाबतच्या आदेशात लवादाने म्हटले आहे.

दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प कोहिनूर समूहाने २००९मध्ये जाहीर केला होता. कोहिनूर मिल्सची जागा विकत घेतल्यानंतर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोषित करण्यात आला. आशियातील व भारतातील सर्वात उंच आलिशान पंचतारांकित हॉटेल उभारण्याची पहिल्यांदा योजना होती. मात्र त्यात २०१३ मध्ये बदल करण्यात आला. आता एका टॉवरमध्ये हॉटेल आणि व्यापारी सदनिका तसेच दुसऱ्या टॉवरमध्ये निवासी सदनिका अशी योजना आहे. २०१६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु या प्रकल्पाची महारेराअंतर्गत नोंदणी करून आता २०२० ही नवी तारीख देण्यात आली आहे.

प्रकरण काय?

एडलवाईज अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने याबाबतची याचिका लवादाकडे दाखल केली होती. आंध्र बँकेने दिलेल्या मूळ कर्जावर ५० कोटी ९६ लाख ७२ हजार ८६३ रुपयांची देणी कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने परत केलेली नाहीत, असे त्यात नमूद होते. ‘कोहिनूर स्क्वेअर’साठी आंध्र बँकेने कर्जपुरवठा केला होता. परंतु कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने २६ एप्रिल २०१७ पर्यंत ही रक्कम थकविली होती. आंध्र बँकेच्या वतीने एडलवाईज अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने वसुली सुरू केली होती. दिवाळखोरी समायोजन प्रक्रियेनुसार लवादाने जूनमध्ये आदेश जारी करीत याबाबत जाहीर प्रसिद्धी देण्याचेही आदेश दिले होते. या आदेशानुसार आता अंतरिम समायोजन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्याने या संदर्भातील संहितेतील तरतुदीनुसार प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही प्रक्रिया २७० दिवसांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

काय आहे कोहिनूर स्क्वेअर?

  • दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांचे दोन जुळे टॉवर
  • ऊर्जाबचत आणि पर्यावरणस्नेही इमारत म्हणून सुवर्णपत प्राप्त
  • मुख्य इमारतीतील पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरित ४७ मजले सिंगापूर ब्रॅण्डचे ‘आयू मुंबई’ हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी सदनिका.
  • जुळ्या इमारतीतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी; तब्बल दोन हजार गाडय़ांची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान सदनिका.
  • या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २१०० कोटी

हा काही पहिलाच प्रकल्प नाही जो या मार्गाने गेला आहे. याआधीही देशभरातील अनेक कंपन्या, विकासकांवर ही वेळ आली आहे. त्यात वेगळे काही नाही. प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छा आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच ही समायोजन प्रक्रिया आहे. मला अतिरिक्त कर्जाची गरज आहे. या प्रक्रियेमुळे ती पूर्ण होईल. हा प्रकल्प मी कोणालाही विकलेला नाही. हा प्रकल्प मीच पूर्ण करणार आहे. पुढील महिन्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू झालेले असेल. महारेराअंतर्गत या प्रकल्पाची नोंद केलेली आहे. त्यात दिलेल्या मुदतीआधीच प्रकल्प पूर्ण होईल   – उन्मेष जोशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर समूह.