आंधळेपणाने खेळण्यासाठी ‘करिअर’ हा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे, त्याची निवड सजगपणे आणि अभ्यासकपूर्वकच केली पाहिजे. करिअर निवडीत गोंधळ असल्यास त्यासाठी क्षमता वा कल चाचणीसारखे अनेक शास्त्रीय पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेऊन आपल्याला आवडतील व झेपतील असे अभ्यासक्रम निवडून त्यातील कौशल्य झोकून देऊन आत्मसात केले तर निश्चितपणे यश मिळेल,’ असा सूर mu06‘करिअरविषयक निवड’ या विषयावर विद्यार्थी आणि पालकांना विविध दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी व्यक्त केला.
‘विद्यालंकार’ प्रस्तुत ‘लोकसत्ता- करिअर यशाचा’ या परिसंवादाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या सत्रात ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या मानसोपचारतज्ज्ञ नीलिमा आपटे क्षमता वा कल चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित केले. गुणांची टक्केवारी किंवा मित्रमैत्रिणींचा आग्रह हा अभ्यासक्रम निवडीचा मार्ग असू शकत नाही. तसेच, एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ हुशार असून चालत नाही. तर त्यासाठी अनुकूल असे व्यक्तिमत्त्वही विकसित करावे लागते, असे आपटे यांनी स्पष्ट केले. ‘सॉफ्ट स्किल्स’चे महत्त्व अधोरेखित करताना गौरी खेर यांनी वाचन, छंद, खेळ, व्यायाम अशा किती तरी लहान लहान गोष्टींमधून ही कौशल्ये विकसित होत असल्याचे सांगितले. सॉफ्ट स्किल ही जीवनकौशल्ये असून ती आपल्याला आयुष्यभर पुरतात. तसेच, ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असून त्यामुळे आपल्या ‘हार्ड स्किल्स’ना तकाकी मिळते, अशी मांडणी त्यांनी केली. आपल्या जडणघडणीच्या वर्षांमध्येच गुंतवणूक करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. विवेक वेलणकर यांनी ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि संधी’ यावर मार्गदर्शन करताना दहावी-बारावीनंतर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना विचार करता येतील, अशा करिअरविषयक संधीचा मोठा पटच उलगडला. टर्नर, फिटरपासून वैमानिक होण्यापर्यंतच्या विविध करिअरविषयक संधींची माहिती देण्याबरोबरच त्यांनी विद्यार्थी-पालकांमध्ये अमुक एका विषयाला प्रवेश घेतल्यानंतरच करिअरविषयक अधिक संधी असतात, हा विभ्रमही दूर केला. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडता यावा यासाठी ‘खूप आवडलेले, झेपलेले आणि जमणारे’ अशा विषयांची स्वतंत्र यादी करून त्यातून निवड करण्याचा सोपा मंत्रच त्यांनी  विद्यार्थ्यांना सांगितला. याशिवाय ‘विद्यालंकार’चे हितेश मोघे, एमकेसीएलचे अमित लाड, मुंबई विद्यापीठाच्या ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’चे निरंजन आमटे आणि चंद्रशेखर आपटे, भारती विद्यापीठाचे प्रा. अनिलकुमार देशमुख यांनीही विविध अभ्यासक्रमांची माहिती देऊन मागदर्शन केले.
आजचे कार्यक्रम
गौरी खेर, नीलिमा आपटे आणि विवेक वेलणकर यांचे मागदर्शन विद्यार्थ्यांना शनिवारीही लाभणार आहे. शनिवारी हा परिसंवाद सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या वेळी आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिय़ूशन्स, भारती विद्यापीठ, विद्यालंकार (अभियांत्रिकी अ‍ॅण्ड मेडिकल), विद्यालंकार पॉलिटेक्निक, एमकेसीएल, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, संकल्प आयएएस फोरम, डोंबिवली नागरी सहकारी बँक, विद्यासागर क्लासेस, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रेझोनन्स, आयडीईएमआय, लक्ष्य अकादमी, सस्मिरा, विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड म्डेव्हलपमेंट, पथिक एचआरडी, विद्यालंकार क्लासेस, द युनिक अकादमी, अरिन अ‍ॅनिमेशन या शैक्षणिक संस्थांतर्फे प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले जात आहे.