‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या निवडक अग्रलेखांचे संकलन असलेल्या ‘लोकसत्ता अग्रलेख’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली असून, त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ‘डायमंड पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात ‘लोकसत्ता’मधील गाजलेल्या निवडक अग्रलेखांचे संकलन करण्यात आले आहे.
गेल्या २ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. ‘डायमंड पब्लिकेशन्स’चे दत्तात्रय पाष्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
या पुस्तकास पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच एका महिन्यात या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. गेल्या आठवडय़ातच त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली.
राष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहाच्या आयुष्यातील दैनंदिन घटना, घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकात्वकडे जाणे हे अग्रलेखाचे महत्त्वाचे कार्य. ‘लोकसत्ता’चे अग्रलेख त्यामुळेच वाचनीय आणि वाचकप्रिय ठरतात. सखोल विचार, परखड विवेचन, सौष्ठवपूर्ण भाषा आणि ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्टय़ आहे. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते अभ्यासकांना उपयुक्त आहेच, पण वाचकांनाही हे पुस्तक वैचारिक आनंदाचा पुनप्र्रत्यय देणारे ठरले आहे.
राजकारण, अर्थकारण, साहित्य-संस्कृती अशा विविध विषयांवरील १०० अग्रलेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. कुबेर यांच्या लेखणीतून उतरलेले हृदयस्पर्शी मृत्युलेख हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे.

भारावून टाकणारा प्रतिसाद
पुस्तकाला वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद अप्रतिम आणि भारावून टाकणारा आहे. ग्रंथालयांतून या पुस्तकाला मागणी आहेच, पण वैयक्तिक स्तरावर जाणकार आणि चोखंदळ वाचकांकडूनही पुस्तक विकत घेतले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पुस्तकाला मागणी असून, पुस्तक वाचल्यानंतर अनेक वाचक दूरध्वनी करून आपली प्रतिक्रियाही कळवत आहेत.
– दत्तात्रय पाष्टे, डायमंड पब्लिकेशन्स