बारा वर्षांपूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी मॉडेल प्रीती जैन हिला सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. परंतु नंतर लगेचच न्यायालयाने तिची जामिनावर सुटकाही केली. चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून भांडारकर याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप जैन हिने केला होता. परंतु या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यावर भांडारकर यानेच तिच्याविरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार केली होती.

प्रीतीसह तिचा साथीदार आणि गुन्हेगारीकडून राजकारणाकडे वळलेल्या अरूण गवळीच्या टोळीचा गुंड नरेश परदेशी यालाही न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २००४ मध्ये जैन हिने भांडारकर याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर वर्षभराने तिने परदेशीच्या सहकार्याने त्याच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी तिने परदेशीला ७५ हजार रूपयेही दिले होते, असा जैन हिच्यावर आरोप होता. न्यायालयाने तिला दोषी ठरवून शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच जामिनही मंजूर केला. तसेच निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी चार आठवडय़ांची मुदतही दिली.

चित्रपटात मुख्य भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत भांडारकर याने १९९९ ते २००४ या कालावधीत अनेकदा आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप प्रीतीने तक्रारीत केला होता. त्याने आपल्याशी लग्न करण्याचेही वचन दिले होते. परंतु नंतर मात्र त्याने आपल्याकडे पाठ फिरवली, असाही आरोप तिने केला होता. या सगळ्याचा सूड उगवण्यासाठी जैन हिने दगडी चाळीत जाऊन अरूण गवळी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळी गवळी तिला भेटला नाही. त्यामुळे तिने परदेशी याची भेट घेतली. त्याने भांडारकर याची हत्येची ‘सुपारी’ आपण घेत असल्याचे तिला सांगितले. त्यासाठी तिने परदेशीला ७५ हजार रूपये दिले. त्यानंतर परदेशी याने दोन व्यक्तींच्या आधारे उत्तर प्रदेशहून पिस्तुलाची व्यवस्था केली. नंतर ठरल्यानुसार परदेशी याने त्या दोन व्यक्तीच्या साथीने भांडारकर याच्या घराभोवती पाळत ठेवली. त्याच्या प्रत्येक हालचालीवर देखरेख ठेवण्यात आली. परंतु त्याने भांडारकर याची हत्या केली नाही. त्यामुळे संतापलेल्या जैन हिने पुन्हा एकदा दगडी चाळीत जाऊन गवळीची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गवळी त्याच्या अखिल भारतीय सेनेने आयोजित कार्यक्रमात होता. त्यामुळे जैन हिने त्याच्या ‘खास माणसा’कडे परदेशीची तक्रार केली. गवळीला या हत्येच्या कटाबाबत कळले तेव्हा त्याने त्याच्या वकिलामार्फत आग्रीपाडा पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी जैन हिच्यासह सहाजणांना अटक केली होती, अशी माहिती सरकारी वकील मनोहर कांदळकर यांनी दिली.