यंदा अर्जदारांची संख्या गतवर्षीपेक्षा अधिक

‘म्हाडा’च्या बहुप्रतिक्षित घरांच्या योजनेत यंदा अनेकांनी नशीब आजमावण्याची संधी घेण्याचा प्रयत्न केला असून ९७२ घरांच्या सोडतीसाठी तब्बल एक लाख ५१ हजार ३१२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. गेल्यावर्षीच्या सोडतीपेक्षा अर्जदारांची ही संख्या अधिक असून २३ जुलैही अर्ज करण्याची शेवटची मुदत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर इच्छुकांचे अर्ज दाखल होत असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘म्हाडा’ ची घरांसाठीची योजना गेल्या महिन्यात जाहीर झाली असून या सोडतीचे वेळी उत्पन्न मर्यादेप्रमाणे घरांच्या क्षेत्रफळातही बदल करण्यात आले आहेत. गोरेगाव, बोरिवली, मानखुर्द, पवई, कांदिवली, चांदिवली, सायन, चेंबूर, अंधेरी, वडाळा, घाटकोपर, कुर्ला, जोगेश्वरी, दहिसर, मालाड, मुलुंड, सांताक्रूझ, मालाड आदी भागांत घरे असल्याने अनेक जण या सोडतीच्या प्रतिक्षेत होते. मात्र, ही योजना जाहीर करण्यासाठी म्हाडाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. या सोडतीसाठी अर्ज करावा लागणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यापासून ते सोडतीसाठी घरांसाठी जमवा-जमव करण्यापर्यंत म्हाडाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली होती. मुख्यमंत्री कोटय़ातील घरे, विकली न गेलेली व बांधकाम होत असलेली घरे आदींची जुळवाजुळव करून ९७२ चा आकडा जुळवण्यात आला. तसेच यातील काही घरे ही २ ते ८ वर्षे जुनी देखील असून त्यांच्या दुरूस्तीचे काम देखील सध्या म्हाडातर्फे सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहीलेल्या या सोडतीला घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी मात्र प्रतिसाद दिला. या सोडतीसाठी एकूण नोंदणी एक लाख २८ हजार ५७९ जणांची झाली असून त्यांनी एक लाख ५१ हजार ३१२ अर्ज केलेत. पैसै भरण्याची मुदत २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत असून धनाकर्षांद्वारे पैसै भरण्याची अंतिम मुदत २७ जुलै आहे.