‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा प्रथमच कमी झाली आहे. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटूनही बारावीच्या निकालाचा गुणात्मक दर्जा वाढल्याने यंदा विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे, मुंबईत पदवी महाविद्यालयांमध्ये चालविल्या जाणाऱ्या व्यावसायिकबरोबरच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चुरस असणार आहे.
अंतर्गत मूल्यांकन, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेतील एकत्रित गुणांच्या आधारे उत्तीर्ण ठरविण्याची पद्धती यामुळे गेल्या दोन वर्षांत विशेष प्रावीण्यासह (७५ टक्क्यांहून अधिक गुण) आणि प्रथम श्रेणीत (६० टक्क्यांहून अधिक) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. हे प्रमाण वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रकर्षांने दिसते. परंतु, या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊनही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ५६४५ने वाढली आहे हे विशेष. तर प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७९६०ने वाढली आहे. यामुळे या वर्षी मुंबईत प्रवेशासाठीही चांगलीच चुरस असणार आहे.
खरे तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या जागा जास्त आहेत. मात्र, पारंपरिक महाविद्यालयांमधून उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असणार आहे. ‘किंबहुना वाणिज्य शाखेसारख्या अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्रावीण्य किंवा प्रथम श्रेणी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास ही स्पर्धात्मकता कारणीभूत आहे,’ अशी प्रतिक्रिया निकालाचे विश्लेषण करताना डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी दिली.
विज्ञान शाखेचा निकाल गुणात्मकदृष्टय़ा  उंचावण्यास अंतर्गत मूल्यांकनाचे (प्रात्यक्षिक आणि प्रोजेक्ट) ३० टक्के गुण कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. एस. बी. चव्हाण यांनी दिली. आपल्या मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयांमार्फत सढळ हस्ते हे गुण दिले जातात. याचबरोबर अभियांत्रिकी प्रवेशांकरिता बारावीच्या परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरले जात असल्याने विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास गांभीर्याने घेऊ लागले आहेत. त्याचेही परिणाम परीक्षेचा निकाल उंचावण्यात झाले आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य विजय जोशी यांनीही अंतर्गत मूल्यांकनामुळे टक्केवारी वाढत असल्याचे स्पष्ट केले.
ठाण्यात ९०.४८ टक्के निकाल
ठाणे जिल्ह्य़ात बारावीच्या निकालाची टक्केवारी  ९०.४८ टक्के एवढी घसघशीत आहे. उत्तीर्णामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९४.८ टक्के लागला तर मुलांचा ८७.२८ टक्के निकाला लागला. विज्ञान शाखेत ३१,३५५ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यांच्यापैकी २९,२५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत २१,७५६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील १८,४६८ उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ५४,६२२ विद्यार्थी परीक्षेस बसले तर ४९६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमात १४४० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यात १३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा (९३.३० टक्के). कला शाखा (८४.८९ टक्के ), वाणिज्य शाखा (९१.०४ टक्के), व्यावसायिक अभ्यासक्रम (९२.०८ टक्के) या प्रमाणे उत्तीर्णाची टक्केवारी आहे. जिल्ह्य़ात एकूण १,०९,१३५ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यातील ९८,७४२ उत्तीर्ण झाले. जिल्ह्य़ात ५७,८०० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील ५०,४४५ उत्तीर्ण झाले, ५१,३३५ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या त्यातील ४८,२९७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
रायगडमध्ये मुलींचीच सरशी
या वर्षी रायगडच्या निकालात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ाचा एकूण निकाल ९०.३६ टक्के इतका लागला असून सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मुंबई विभागात अव्वल असणारा रायगड या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या वर्षीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्य़ातून २८ हजार ५१५  विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापकी २८ हजार ४९१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यातील २५ हजार  ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या घटली
वर्षांगणिक राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वच विभागीय मंडळांमध्ये काही हजारांनी वाढते. तशी ती मुंबईतही वाढत असते. पण, यंदा केवळ मुंबईत बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १६८४ने कमी झालेली दिसून येते. इतर कोणत्याही विभागीय मंडळात विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली नाही हे विशेष. यावरून इतर विभागांच्या तुलनेत मुंबईतील पालकांचा सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी आदी विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी धाडण्याचा कल फार आधीच सुरू झाल्याचे दिसून येते. आता हे चित्र पुण्यात दिसण्यासही फार वेळ लागणार नाही.

मुंबईची सतत तीन वर्षे घसरगुंडी
यंदा मुंबईचा निकाल ९०.११ टक्के इतका लागला आहे. नाशिक (८८.१३ टक्के) वगळता इतर सर्व विभाग मुंबईच्या पुढे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो वाढला असला तरी मुंबईची ही घसरगुंडी गेली तीन वर्षे सुरू आहे. गेल्या वर्षी निकाल ८८.३० टक्के तर २०१३ मध्ये ७६.८१ टक्के इतका होता. यंदा २,८६,१३० विद्यार्थ्यांपैकी २,५७,८४६ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मोनिका मोरेचे यश
घाटकोवर स्थानकावर रेल्वे अपघातात दोन्ही हात गमवाव्या लागणाऱ्या मोनिका मोरे ही बारावीच्या परीक्षेत ६३ गुणांची कमाई करत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिने लेखनिकाच्या साहाय्याने बारावीची परीक्षा दिली होती.
दृष्टिक्षेपात निकाल
*निकालाची टक्केवारी – ९१.२६
*परीक्षेला बसलेले विद्यार्थी –
१२ लाख ३७ हजार २४१
*उत्तीर्ण झालेले विद्यार्थी –
११ लाख २९ हजार ०७३
****
निकालाची शाखानिहाय  टक्केवारी
विज्ञान – ९५.७२, वाणिज्य – ९१.६०, कला – ८६.३१, व्यवसाय अभ्यासक्रम – ८९.२०
****
निकालाची वैशिष्टय़े
*निकालात सव्वा टक्क्य़ांनी वाढ
*आतापर्यंतचा सर्वोच्च निकाल
*विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
*कोकण विभाग सलग चौथ्या वर्षी अव्वल
*मुली आघाडीवर असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२९ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८८.८० टक्के.
*अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के
*रात्र महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ६५.०२ टक्के
*राज्यातील ९४६ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल
*११ महाविद्यालयांत शून्य टक्के निकाल
*एकूण १६१ विषयांपैकी १४ विषयांचा निकाल १०० टक्के.
****
गुणांच्या खिरापतीचे अजून एक वर्ष
*अंतर्गत मूल्यमापनासाठी असलेल्या २० गुणांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होतो आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे निकालाचा फुगवटा दिसतो आहे. त्या पाश्र्वभूमीवर उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेतही किमान ३५ टक्के गुण मिळणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*यावर्षीपासून हा निर्णय नववी आणि अकरावीला लागू होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षीही दहावी आणि बारावीचा निकाल विक्रमीच लागण्याची शक्यता.
****
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या
निकालात लक्षणीय वाढ
*यावर्षी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४६.६४ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. मुळात गेल्या वर्षी वाढलेल्या
’यावर्षी ९९ हजार २१९ पुनर्परीक्षार्थीपैकी ४६ हजार २७१ विद्यार्थी उत्तीर्ण.
****
गैरप्रकारांमध्ये घट
*गेल्या वर्षीपेक्षा परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे राज्य मंडळाचे म्हणणे आहे. यावर्षी परीक्षेदरम्यान ५२६ गैरप्रकारांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी ७३५ गैरप्रकारांची नोंद करण्यात आली होती.
****
गुणपत्रकांचे वाटप
 ४ जून दुपारी ३ वाजता
गुणपडताळणी अर्जाची मुदत
४ ते १५ जून
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत
१५ जून

****
निकालाचा नवा विक्रम
वर्ष        निकाल
२०१५        ९१.२६
२०१४        ९०.०३
२०१३        ७९.९५
२०१२        ७४.४६
२०११        ७०.६९
२०१०        ७६.३६
२००९        ८१.९२