गेल्या दशकभरात महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानात देशात घेतलेली आघाडी कायम असून गेल्या वर्षभरात तब्बल १५ लाख ५९ हजार ६६९ रक्ताच्या पिशव्या जमवून स्वत:चाच यापूर्वीचा विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे जमा केलेल्या एकूण रक्तापैकी सुमारे ९५ टक्के रक्त हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून जमा करण्यात आले असून महाराष्ट्राचा पराक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरक ठरणारा आहे. रक्तदान क्षेत्रातील महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेऊन ‘राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद’ने देशात महाराष्ट्राचे ‘मॉडेल’ देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी तसेच उद्योग जगताबरोबरच राजकीय नेते आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या सहभागाने ‘राज्य रक्तसंक्रमण परिषद’ने तब्बल २४ हजार ६४७ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्यात पंधरा लाखांहून अधिक रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या असून देशातील कोणत्याही राज्यात याच्या निम्म्यानेदेखील रक्त जमा होऊ शकलेले नाही. एकेकाळी ऐच्छिक रक्तदानात पश्चिम बंगालची ‘दादागिरी’ होती. तथापि गेले दशकभर ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’च्या अथक प्रयत्नांतून महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम येण्याचा मान टिकवला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत हे रक्त जमा करण्यात आले आहे. आरबीसी, प्लेटलेटस्, प्लाझ्मा आदी रक्तघटक वेगळे केल्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्याची क्षमता राज्याकडे निर्माण झाल्याचे रक्त संक्रमण परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. संजयकुमार जाधव यांनी सांगितले.
राज्यात ३१० रक्तपेढय़ा असून त्यापैकी ७५ शासकीय व निमशासकीय रक्तपेढय़ा आहेत. गेल्या वर्षभरात शासकीय तसेच महापालिकांच्या रुग्णालयातील साडेतील लाख रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी यातून मोफत रक्त उपलब्ध झाले. राज्यात रक्तघटक विलगीकरणाची २४४ ठिकाणी व्यवस्था असून टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास संपूर्ण देशात जमा होणाऱ्या रक्तापैकी केवळ २० टक्के रक्ताचे विलगीकरण होते तर महाराष्ट्राचे प्रमाण देशाच्या तुलनेत ६५ टक्के एवढे आहे.