भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनप्रकरणी पुन्हा आरोप केले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नवी दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा नसल्याने मुख्यमंत्री, भुजबळ, नारायण राणे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते तेथे एक दिवसही राहात नाहीत आणि हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात, असे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्र सदनचे बांधकाम करणारे कंत्राटदार चमणकर बिल्डरने भुजबळ यांच्या कुटुंबियांना उपकंत्राटे दिली. सदनाच्या बांधकामात सुमारे ६५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लोकलेखा समितीने देवून सहा महिने उलटले तरी राज्य सरकार गुन्हे दाखल न करता मूग गिळून गप्प आहे. या गैरव्यवहाराची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या सदनात अन्न-पाणी व अन्य प्राथमिक सुविधाही योग्य नाहीत. राज्यपालांसाठीच्या राखीव दालनातही वाळवी लागली असून अनेक खोल्यांमध्ये गळती व ओल आहे. पंखे, वातानुकूलन यंत्रणेची दुरवस्था आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार तेथे एकही दिवस रहात नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री राज्यात येऊन तीन वर्षे उलटली तरी त्यांनी नवी दिल्लीत राज्यमंत्री म्हणून मिळालेले शासकीय निवासस्थान सोडलेले नाही, हे खेदकारक असल्याची टीकाही त्यांनी केली.