लष्कराच्या कारागृहात पाठवण्यास न्यायालयाचा नकार

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रसाद श्रीकांत पुरोहित याची आर्थर रोड कारागृहातून लष्करच्या कोठडीत पाठवण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे पुरोहित याला आर्थर रोड कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.

सध्या आर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेल्या पुरोहित याने विशेष न्यायालयात अर्ज करून आपल्याला लष्कराच्या हवाली करण्यात यावे, अशी मागणी केली होती. आर्थर रोड कारागृहातील कैद्यांमध्ये गुंडांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे आपल्या जिवाला धोका आहे, असा दावा त्याने ही मागणी करताना केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मात्र त्याच्या या मागणीला तीव्र विरोध केला होता.

एनआयएने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानंतर पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उच्च न्यायालयासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र एनआयएने साध्वीला जामीन देण्यास ना हरकत दाखवताना पुरोहित याच्या जामिनाला मात्र तीव्र विरोध केला. पुरोहित हाच या स्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याने त्याला जामीन नाकारण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह हिची जामिनावर सुटका करताना पुरोहित याला मात्र जामीन नाकारला होता. एनआयएने आपल्या पुरवणी आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंह विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत तिला सगळ्या आरोपांतून दोषमुक्त केले होते, तर पुरोहित याच्यावरील आरोप मात्र तसेच ठेवत केवळ ‘मोक्का’ हटवला होता. त्याच पाश्र्वभूमीवर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

.. तर खटल्याच्या सुनावणीवर परिणाम

पुरोहित याने कारागृह प्रशासनाकडे त्याला होणाऱ्या त्रासाची एकही तक्रार केलेली नाही. उलट कारागृह प्रशासनाकडून त्याची आवश्यक ती काळजी घेण्यात येते. तसेच त्याला लष्कराच्या ताब्यात देण्यात आले तर खटल्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणणे सुरक्षेच्या दृष्टीने एक दिव्य बनेल आणि त्याचा खटल्याच्या सुनावणीवरही परिणाम होईल. एनआयएचा युक्तिवाद विचारात घेत एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. टेकाले यांनी पुरोहित याचा अर्ज फेटाळून लावला.