भायखळा कारागृहात महिला जेलर मनीषा पोखरकर यांच्यासह सहा जणींनी वॉर्डन मंजुळाला बेदम मारहाण केली, तिचा लैंगिक छळही केला, अशी माहिती इंद्राणी मुखर्जीने नागपाडा पोलिसांना दिली आहे. तिचा जबाब भायखळा कारागृहातील महिला कैद्यांचा उद्रेक थंडावल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच २४ जून रोजी नोंदवण्यात आला, अशी माहिती तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. त्यामुळे या प्रकरणात ती महत्त्वाची साक्षीदार ठरू शकेल.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपाडा पोलिसांनी आतापर्यंत पाच महिला कैद्यांचा तपशीलवार जबाब नोंदवून घेतला. त्यात इंद्राणी व मरिअम शेख या दोघींचा समावेश आहे. मरिअमच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी महिला तुरुंगाधिकारी पोखरकरसह एकूण सहा जणींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. मरिअमने २३ जून रोजी  घडलेला संपूर्ण प्रसंग जबाबात सांगितला. त्यात अंडी व पावांचा हिशेब लागत नसल्याने जेलर पोखरकर व पाच महिला गार्डनी मंजुळाला बेदम मारहाण केली, लैंगिक छळ केला, असा दावाही केला. नेमका असाच जबाब इंद्राणी व अन्य तिघींनी दिला आहे. मरिअम व इंद्राणीच्या जबाबात साम्य आहे, अन्य तिघींचे जबाबही मिळतेजुळते आहेत, असे याअधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मंजुळाच्या मृत्यूची माहिती मिळताच २४ जूनला कारागृहातील महिला कैद्यांनी धुडगूस घातला.

जे जे रुग्णालयाने मंजुळाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल दिला असला तरी पुढील चाचण्यांसाठी व्हिसेरा जपून ठेवला आहे. तो अहवाल अद्याप हाती पडलेला नाही. त्यावरून मंजुळाच्या मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट होईल. त्याशिवाय अन्य महिला कैदी किंवा साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. त्यातून जो निष्कर्ष पुढे येईल त्याआधारे आरोपी करण्यात आलेल्या कारागृहातील सहा महिला पोलिसांच्या अटकेचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कारागृहात भोंगा वाजलाच नाही

मंजुळाच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुमारे तीनशे महिलांनी धुडगूस घातला तेव्हा आतील पोलीस अधिकाऱ्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. कैदी एकत्र येतात तेव्हा नियमांनुसार पहिल्यांदा शिट्टी वाजवून व नंतर भोंगा वाजवून कारागृहाच्या विविध भागांत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्क करणे आवश्यक असते. पण २४ जूनला भायखळा कारागृहात महिलांच्या उद्रेकानंतर ना शिट्टी वाजली, ना अलार्म. कारागृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी कारागृह अधीक्षक सुटीवर होते. कारागृह विभागाचे व महिला कारागृहाशेजारीच कार्यालय असलेले पोलीस महानिरीक्षक मुंबईबाहेर हेाते. त्यामुळे कारागृहात जबाबदार कोणीच उपलब्ध नव्हते. अचानक घडलेल्या या उद्रेकानंतर ठरवून दिलेले नियम पाळण्याऐवजी महिला कैद्यांना आवरण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.

[jwplayer qGBQWUiE]