मराठी माणसाच्या सामूहिक ऊर्जेला आवाहन करण्यासाठी येत्या ‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने मराठमोळ्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धावा मराठीसाठी’ या घोषवाक्याने आबालवृद्धांना मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी प्रेरित करणारी ही मॅरेथॉन रविवार २३ फेब्रुवारीला शिवाजी पार्क येथून सुरू होईल. ‘पाल्रे पंचम’ आणि ‘मराठी अभ्यास केंद्र’ यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्कवरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी सात वाजता ही मॅरेथॉन सुरू होऊन महापौर निवासस्थानाजवळील संयुक्त महाराष्ट्र दालनापाशी संपेल. ही स्पर्धा १२ ते १५, १६ ते ६० आणि ज्येष्ठ नागरिक या वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी ही स्पर्धा असेल. मॅरेथॉनच्या मार्गावर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची माहिती देणारे छायाचित्रांसहित फलक लावण्यात येतील.