पणन मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी माथाडी कायदा हद्दपार करण्याचा प्रयत्न केल्यास ज्या-ज्या ठिकाणी माथाडी कामगार आहेत, त्या-त्या ठिकाणी त्यांची गाडी अडवली जाईल, त्यांना राज्यात फिरू देणार नाही. वेळ पडल्यास राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी वाशी येथील माथाडी कामगारांच्या सभेत दिला.
पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील बाजार समितीमधील सर्वच कामे यापुढे माथाडी कामगारांना न देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात पाच लाखांहून अधिक माथाडी कामगार विविध समित्या आणि कारखान्यांत काम करीत असून ३६ छोटय़ा-मोठया संघटना त्यांचे नेतृत्व करीत आहेत. यात महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना ही सर्वात मोठी आणि जुनी संघटना मानली जाते. त्यामुळे विखे-पाटील यांनी असा मनोदय व्यक्त केल्याने मंगळवारी वाशी येथील माथाडी भवनासमोर त्यांच्या निषेधात सभा झाली. त्यात पाटील यांनी हा इशारा दिला. माथाडी संघटनेच्या या चळवळीला व्यापारी संघटनेची साथ असून त्यांचे नेते मोहन गुरुनानी, संजय पानसरे यांनीही एफडीआयवरून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. एफडीआयसाठी या सर्व पायघडय़ा घातल्या जात असून माथाडी किंवा व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे हे षडयंत्र आहे. वॉलमार्टसाठी केंद्र सरकारने सुपारी घेतली आहे आणि केंद्राच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री व पणनमंत्री काम करीत आहेत. देशात कुठेही अस्तित्वात नसलेला माथाडी कायदा हद्दपार करण्याचे धारिष्टय़ सरकारने दाखवू नये या कायद्यावर सर्वाच्च न्यायालयानेही एका निकालात विश्वास व्यक्त केला आहे असे पाटील म्हणाले. माथाडी कामगारांचा अंत पाहू नये. आमचे नेते केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला न्याय देतील असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला. आमदारकीपेक्षा माथाडी चळवळ महत्वाची आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
हे आमचे दुर्दैव!
राज्यातील बहुतेक बाजार समित्यांवर राष्टवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. काँग्रेसला ही मक्तेदारी संपुष्टात आणायची आहे. त्यामुळे विखेपाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावाने माथाडी व व्यापाऱ्यांना  हद्दपार करण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही या सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी यात मदत करीत नसल्याची कबुली व्यापारी नेते पानसरे यांनी दिली. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, हे आमचे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.