नागरिकांनीच रस्ते ओळखून संबंधितांना कळवण्याचे महापौरांचे आवाहन
दरवर्षी पावसाळय़ादरम्यान रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलणाऱ्या मुंबईतील सरकारी यंत्रणांच्या कारभारांचा नमूना यंदाही पाहायला मिळत आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांची जबाबदारी पालिकेची नसून एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचेही अनेक रस्ते आहेत. अशा रस्त्यांवरील खड्डे बघून संबंधित यंत्रणांना त्याची सूचना करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी सांगितले. त्याचवेळी राज्य सरकारने पैसे दिल्यास त्यांच्या रस्त्यांवरील खड्डेदेखील आम्ही बुजवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेले काही दिवस शहरातील खड्डय़ांवरून राजकारण पेटले आहे. प्रत्येक पक्षाकडून खड्डय़ांची पाहणीदौरेही आयोजित करण्यात आले. काँग्रेसने खड्डय़ांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले तर मनसेने थेट सहाय्यक आयुक्तांनाच जबाबदार धरत त्यांचे अपहरण करण्याची योजना आखली. सत्ताधारी सेना भाजपाही या खड्डे पाहणीत मागे नाहीत. सेनेने राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्त्यांची पाहणी केली. त्याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भाजपाचे खासदार किरीट सोमैय्या यांनी ईशान्य मुंबईतील खड्डय़ांच्या छायाचित्रांचा आल्बम काढला.
मंगळवारी महापौर दालनात भाजपा गटनेते मनोज कोटक व नगरसेवकांसोबत किरीट सोमैय्या यांनी हा अल्बम महापौरांकडे सुपूर्द केला. त्यानंतर महापौरांनी पत्रकारांशी झालेल्या संवादात मुंबईतील अनेक रस्ते पालिकेच्या ताब्यात नसूनही त्यावरील खड्डय़ांचा दोष पालिकेकडे येत असल्याचे सांगितले. प्रत्येक रस्त्यावर त्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचा फलक लावणे गरजेचे आहे. म्हणजे रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी लोकांना थेट त्या संस्थेकडे तक्रार नोंदवता येईल.
तसेच राज्यशासनाने खड्डे बुजवण्याचा खर्च उचलला तर आम्ही सर्व खड्डे बुजवू, लोकांचीही जबाबदारी असून त्यांनी संबंधित संस्थेकडे तक्रार नोंदवावी, असे महापौरांनी सांगितले. वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मदतीने आठ दिवसांत खड्डे बुजवण्याचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून येत्या १५ दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील, असे त्या म्हणाल्या.