भाजप हा आता पूर्वीचा पक्ष राहिलेला नसून ‘भारतीय जैन पक्ष’ झाल्याची खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) करण्यात आली आहे. पर्युषण पर्वामध्ये मुंबईत मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात मनेसेने सोमवारी मुंबईत जोरदार आंदोलन केले. दादरच्या आगारबाझार येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली. पर्युषण पर्वामध्ये २९ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी देवनार पशुवधगृह बंद ठेवण्याचे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात पशुवधगृह बंद ठेवण्याबरोबरच मांसविक्रीवर बंदी घातल्याचाही उल्लेख होता. या परस्परविरोधी पत्रकांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. पर्युषण पर्वामध्ये पशुवधगृह ठेवण्याची अट आम्हाला मान्य आहे. मात्र, मांसविक्रीवर बंदी घालणे हा अन्याय आहे. देशात लोकशाही असून आम्ही कोणत्याही प्रकारची बंदी किंवा सक्ती खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.
मराठीचा झेंडा मिरवणारी मनसे गुजराथी मतांच्या शोधात
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीदेखील काल या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांकडून गुजराती ट्वीट केली जातात. त्यातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पर्युषण पर्वातील मांसविक्रीला बंदी घालून मनसे आणि शिवसेनेने या विषयावर प्रतिक्रिया दिल्यानंतर वाद तयार करण्याचा प्रयत्न भाजप करतो. जैन आणि गुजराती मते मिळवण्यासाठीची ही रणनीती आहे. अनेक ठिकाणी शाकाहारी वस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघ तयार केले जात आहेत. श्रावणात मांसविक्रीस बंदी नसते तर पर्युषण काळात बंदी करण्याची गरज नाही, असे राज म्हणाले.
गुजराती मते मिळवण्यासाठी भाजपची रणनीती
आगामी मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून गुजराती आणि जैन समाजाची मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी पर्युषण काळात देवनार कत्तलखाना बंद ठेवण्याची मागणी करून वाद निर्माण करण्याची तयारी सुरू केली होती. मुंबई महापालिका दरवर्षी पर्युषण पर्वात पहिला आणि शेवटचा दिवस देवनार कत्तलखाना बंद ठेवते. मीरा-भाईंदर पालिकेने मागील वर्षी आठ दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा वाद झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोनच दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या वादावरून मुंबईत शाकाहारी विरूद्ध मांसाहारी असा वाद पेटला होता.