राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधातील फास अधिक आवळत चालला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलने शनिवारी तपास अधिकाऱ्यांना पारसकरांविरोधात आणखी पुरावे सादर केले. पोलिसांनीही तिचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला आहे.
 एका २६ वर्षीय मॉडेलने राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनिल पारसरक यांच्याविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रारा दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या महिला अत्याचारविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. शनिवारी या मॉडेलने पोलीस मुख्यालयात भेट देऊन अधिक पुरावे सादर केले. हे पुरावे महत्वपूर्ण मानले जात आहेत. भायखळा येथील महिला अत्याचार विरोधी कक्षाच्या कार्यालयात दुपारी तिचा सविस्तर पुरवणी जबाब नोंदविण्यात आला. पारसकर यांनी या मॉडेलला एका आयफोन भेट दिला होता. तसेच तिला मदत केल्याबद्दल काहीतरी मागितले होते. तेव्हा तिने पारसकरांना ७० हजारांचे घडय़ाळ भेट दिले होते. याशिवाय ५७ हजारांची महागडी पर्स आणि इतर वस्तूही दिल्या होत्या. एकदा पारसकरांनी तिला ठाणे किंवा नवी मुंबई येथील एका फ्लॅटमध्ये नेले आणि तेथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच पारसकरांनी माफी मागितल्याचेही ती म्हणाली. त्यानंतर मढ येथील एका बंगल्यात नेले आणि तेथे बलात्कार केल्याचे तिने सांगितले आहे. यावेळी पारसरकरांनी मद्यपान केले होते असेही तिने सांगितले. पोलिसांनी यापूर्वीच घटनेचा पंचनामा केला असून बंगल्याचा सुरक्षा रक्षक आणि मालकाचे जबाब नोंदविले असून त्यांनीही ही मॉडेल बंगल्यात आली होती, असे सांगितले आहे.